SSC result Success Story : बालवयात लग्न, पतीचं अकाली निधन पण पोराचा हट्ट अन् पुण्यातील 'मायलेक' एकाच वेळी दहावी पास
आज दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात पुण्यातले मायलेक एकत्र परीक्षा देऊन उत्तम गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे या दोघांची पुण्यात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
SSC result Success Story : आज दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात पुण्यातले मायलेक एकत्र परीक्षा देऊन उत्तम गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे या दोघांची पुण्यात सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. आई मोनिका तेलंगे आणि मुलगा मंथन तेलंगे या मायलेकांनी य़ंदा दहावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. त्यानंतर दोघांनी मिळून अभ्यास केला. मुलाच्या पाठिंब्यामुळे हे दोघे चांगल्या गुणांना दहावीत उत्तीर्ण झाले आहे. आई कचरावेचक कामगार आहे. परिस्थिती हलाखीची असताना मुलाचं शिक्षण केलं आणि सोबतच स्वत:चंही स्वप्न पूर्ण केलं. आई मोनिका य़ांना 51.8 टक्के आणि मुलाला 64 टक्के गुण मिळाले आहेत. हे दोघेही पुण्यातील हडपसर परिसरात राहतात.
बालवयात मोनिका यांचा विवाह झाला होता. त्यावेळी त्या नववी शिकल्या होत्या. मात्र संसार आणि मुलांमुळे त्यांना पुढचं शिक्षण घेणं शक्य झालं नाही. त्यात त्यांच्यावर नियतीनेदेखील घाला घातला आणि अचानक त्यांच्या पतीचं निधन झालं. लॉकडाऊन सुरु असताना त्यांचा मुलगा ऑनलाईन शिक्षण घेत होता. त्यावेळी त्यादेखील मुलाचा अभ्यास घेत होत्या आणि शाळेत शिकवत असलेल्या विषयांची माहिती त्यांच्या कानावर पडत होती. त्यांनादेखील अभ्यासात रस वाढला आणि नंतर त्यांनी मुलाचा गृहपाठ सोडवायला सुरुवात केली. मोनिका तेलंगे या मागील 7 ते 8 वर्षांपासून पुण्यातील स्वच्छ संस्थेमार्फत कचरावेचक कर्मचारी म्हणून काम करतात. पतीच्या निधनानंतर त्यांनी एकटीने एक मुलगा आणि मुलगी अशा दोघांना सांभाळलं.
लॉकडाऊनमध्ये मुलासोबत केला अभ्यास...
लॉकडाऊन सुरु असताना मुलगा मंथन आणि मोनिका एकत्र अभ्यास करु लागल्या. त्याच काळात मंथनला आईची शिक्षणासंदर्भातील कळकळ लक्षात आली आणि त्यांने आईकडे दहावीचा फॉर्म भरण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाय मोनिका यांनादेखील शिक्षणात रस होताच त्यामुळे त्यादेखील अभ्यास करु लागल्या आणि मुलाबरोबरच त्यांनीदेखील यंदा दहावीची परिक्षा दिली आणि मायलेकांनी दोघांनी यंदा दहावीत बाजी मारली.
कामावरच्या सरांनी दहावीत प्रवेश घेऊन दिला...
मोनिका कचरावेचक कामगार आहेत. त्यांच्या ऑफिसमधील एका सरांनी त्यांना दहावीत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे आज मोनिका आणि त्यांचा मुलगा दोघांनीही यश प्राप्त केलं आहे. मोनिका यांना पुढेदेखील शिकण्याची इच्छा आहे. मात्र आधी मुलाचं शिक्षण पूर्ण करुन त्याला मोठं झालेलं बघायचं असल्य़ाचं मोनिका यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.