(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parenting Tips : तुमचेही मूल मूडी आहे का? मुलांना समजून घेण्यासाठी 'या' सोप्या पद्धती फॉलो करा
Parenting Tips : तुमचे मूलही कधी रागावते, कधी शांत, कधी चिडचिड आणि कधी खोडकर होते का? अशा मुलांना हाताळणे सोपे काम नाही.
Parenting Tips : प्रत्येकाच्या आयुष्यात पालकत्व (Parenting Tips) ही फार मोठी जबाबदारी असते. लहानपणी मुलांना तुम्ही जी वागणूक आणि जे संस्कार देता मुलं त्याचं अनुकरण करून तसेच वागतात. काही मुलं प्रत्येक परिस्थितीशी, वातावरणाशी अगदी सहज जुळवून घेतात. तर, याऊलट काही मुलं फार हट्टी आणि मूडी असतात. मुलं हट्टी आणि मूडी होण्यामागे खरंतर अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, घरात जर सकारात्मक वातावरण नसेल तर मुलं हट्टी होतात. घरात सतत भांडणं होत असतील, शाळेत शिक्षकांकडून सतत वागणूक चांगली मिळत नसेल तर किंवा रोज काहीतरी कुरबुरी होत असतील तर अशा वेळी मुलं मूडी किंवा हट्टी होतात. अशा मुलांना हाताळणं खरंतर एक आव्हानच आहे. ही समस्या साधारण किशोरवयीन मुलांमध्ये जास्त दिसून येते. कारण या काळात त्यांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात.
खरंतर, अशा वेळी पालकांनी मुलांशी संवाद साधून ही समस्या बऱ्याच अंशी सुटू शकते. पण, तरीही तुमचे मूल ऐकत नसेल तर तुम्ही काही पद्धती नक्कीच वापरून पाहू शकता.
भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या
मूडी मुलांना नीट हाताळण्याचा पहिला आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या. जेणेकरुन कोणत्याही भावना शेअर करताना त्यांच्या मनात भीती नसणार. प्रत्येक क्षणी बदलणाऱ्या मूडमागे मुलांच्या आत दडलेल्या भावना असू शकतात. अशा वेळी शांत बसून त्यांच्याशी संवाद साधा.
हायपर होऊ नका
प्रत्येक क्षणी मुलांच्या बदलणाऱ्या मूडमुळे अनेकदा पालक हायपर होतात. तर असे करू नका. अशा वेळी जास्त प्रतिक्रिया न देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यांच्या काही हालचालींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण त्यांना मारणं हा त्यांना शांत करण्याचा योग्य पर्याय नाही. यामुळे ते तुमच्याशी आणखी वाईट वागू शकतात. मुलांचा कोणत्या गोष्टींमुळे मूड खराब होऊ शकतो हे लक्षात घ्या.
घरातील वातावरण सकारात्मक ठेवा
अनेक वेळा कौटुंबिक वातावरणही मुलांच्या अशा वागण्याला, स्वभावालाा कारणीभूत ठरू शकते. जर घरात सतत राग, भांडण, चिडचिड, शिवीगाळ होत असेल तर त्याचा तुमच्या मुलाच्या जडणघडणीवर परिणाम होतो. त्यामुळे घरातील वातावरण शक्य तितके सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :