Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील अश्वबाजाराची ख्याती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, तो जागतिक पातळीवरही ओळखला जातो.

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील अश्वबाजाराची (Sarangkheda Horse Market) ख्याती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून, तो जागतिक पातळीवरही ओळखला जातो. यंदाही विविध राज्यांमधून अनेक दिव्य आणि दिमाखदार घोडे विक्रीसाठी येथे दाखल झाले आहेत. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kl) यांचे सुपुत्र आदित्य कुल (Aditya Kul) यांचे अश्वप्रेम यावेळी विशेष लक्षवेधी ठरले आहे. आदित्य यांनी बाजारातून तब्बल 11 लाख 11 हजार 111 रुपये देऊन नुकरा जातीची घोडी खरेदी केली आहे. दर वर्षी अनेक सेलिब्रिटी या बाजारात येऊन घोडे खरेदी करतात, ही त्याची विशेष ओळख आहे.
जातिवंत आणि उमद्या अश्वांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा बाजारात यंदा सुमारे 2500 घोड्यांची नोंद झाली असून आतापर्यंत 50 लाखांहून अधिक उलाढाल झाली आहे. युवराज, सुलतान, रुबी आणि मानसी हे घोडे यंदाही बाजारात सर्वाधिक चर्चेत असून अश्वशौकिन त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
Nandurbar News: 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी
भरतपूर (राजस्थान) येथील कृष्णवीरसिंग राजपूत यांच्या मालकीची केवळ 20 महिन्यांची नुकरा जातीची ही घोडी आदित्य कुल यांनी खरेदी केली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या लॉ विभागात प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या आदित्य यांनी अश्वप्रेमातून ही खरेदी केल्याचे सांगितले. मागील वर्षीही त्यांनी याच बाजारातून घोडा घेतला होता. आदित्य यांनी बाजारातून तब्बल 11 लाख 11 हजार 111 रुपये देऊन नुकरा जातीची घोडी खरेदी केली आहे.
Nandurbar News: नुकरा जातीच्या घोडीची वैशिष्ट्ये काय?
नुकरा ही अत्यंत मौल्यवान आणि मागणी असलेली घोड्यांची जात मानली जाते. उंच, सडपातळ आणि रुबाबदार शरीरयष्टी ही या जातीची खास ओळख. या घोड्यांची किंमत लाखांतून कोट्यवधींपर्यंत जाते. उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि स्वभावामुळे ही जात विशेष मानली जाते.
Nandurbar News: जवळपास 350 वर्षांची परंपरा
दरम्यान, तापी नदीकाठी वसलेल्या सारंगखेडा गावाचे एकमुखी दत्त मंदिर आणि येथील यात्रा उत्सव जवळपास 350 वर्षांची परंपरा जपतात. भारतातील पुष्करनंतर सर्वाधिक प्रतिष्ठित अश्वबाजार म्हणून सारंगखेड्याची गणना होते. इतिहासकालीन पुराव्यानुसार, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनीही या बाजारातून घोडे खरेदी केल्याचे उल्लेख आहेत. युद्धकाळात छत्रपती संभाजी महाराजांनी तापीकाठी मुक्काम ठोकला होता आणि येथेच घोडे खरेदी केल्याचा दाखला ऐतिहासिक संदर्भांत तसेच मालिकांमध्ये आढळतो.
Nandurbar News: चेतक फेस्टिवलमध्ये 50 हजारापासून तर 11 करोडपर्यंतचे घोडे
सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जात आहे. या घोडे बाजारातून दरवर्षी शंभर कोटीची उलाढाल होत असते, यामुळे चेतक फेस्टिवल महाराष्ट्रातला सर्वात मोठा महोत्सव म्हणून प्रसिद्ध होत आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने याला हातभार लावून चालना देण्याचं काम केलं पाहिजे. सारंगखेडाच्या यात्रेत सर्व प्रकारचे घोडे येत असतात. यात प्रामुख्याने घोड्यांच्या स्पर्धा होत असतात. घोडा हा शुभ लक्षण आहे, यामुळे अनेक शौकीन आपल्या घरासमोर घोडा ठेवत असतात तर आणि घोडे अश्वसंयोगाच्या व्यवसाय देखील होत असतो. या चेतक फेस्टिवलमध्ये 50 हजारापासून तर 11 करोड पर्यंतचे घोडे येत असतात. यामुळे ही यात्रा अश्वशौकीनांसाठी एक पर्वणीच असते, असे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 2500 अश्वांची एंट्री; आमदारपुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा

























