Kidney Stone : हिवाळ्यातच मुतखडा जास्त का होतो? जाणून घ्या कारणे व त्यावरील उपचार
Kidney Stone in Marathi : हिवाळ्यात तापमानाचा पारा खालावल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मूत्रपिंडावरही त्याचा दबाव वाढतो.

हिवाळ्यात तापमानाचा पारा खालावल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मूत्रपिंडावरही त्याचा दबाव वाढतो. शरीरातील अतिरिक्त द्रव आणि हानिकारक रसायनं काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडाला अधिक रक्त प्रवाहाची आवश्यकता असते, परंतु रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात रक्त मिळत नाही आणि मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव वाढतो. थंडीत तहान कमी झाल्याने बरेचजण पाणी कमी पितात, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्त घट्ट व्हायला लागत.
तापमानात घट झाल्याने २० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये मूतखड्याच्या समस्येत वाढ होऊ लागली आहे. एकेकाळी वयोवृद्ध व्यक्तींचा आजार मानला जाणारा मूतखडा हा आता तरुणांमध्ये सामान्यपणे आढळून येत आहे. मूत्रामध्ये खनिजे आणि क्षार मोठ्या प्रमाणात असतात. लघवीतील खनिजे आणि क्षारांची पातळी वाढते तेव्हा हे स्फटिक एकत्र होऊन दगडांचे रूप घेतात. कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिडपासून तयार झालेले हे खडे मूत्रमार्गात अडथळा आणतात, ज्यामुळे वेळीच उपचार न केल्यास तीव्र वेदना, संसर्ग किंवा मूत्रपिंडाचे नुकसान होते.
मूतखडा होण्याचे कारणे कोणती?
पाणी कमी पिणे, आहारातील मीठाचे वाढलेले प्रमाण, आहारातील प्रथिनांचे वाढते प्रमाण, चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे मोठ्या प्रमाणातील सेवन आणि बैठी जीवनशैली हे मूतखड्यासारख्या समस्येस कारणीभूत ठरतात. जास्त वेळ बसून राहणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे देखील मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेत बिघाड निर्माण होतो. हिवाळ्यातील निर्जलीकरणामुळे देखील मूत्र अधिक आम्लयुक्त होते, ज्यामुळे मूत्रपिंडातील खड्यांचाधोका वाढतो.
मूतखडाच्या लक्षणे कोणती?
पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना होणे, लघवी करताना जळजळ, लघवीवाटे रक्त येणे, मळमळणे किंवा वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे. जर मूत्रपिंडातील खड्यांवर योग्य वेळी उपचार केले नाहीत त्यांचा आकारा वाढू लागतो आणि मूत्रमार्गात संसर्ग आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ लागते.
उपचार हा त्यांच्या आकारावर आणि मूतखड्याच्या स्थानानुसार ठरविला जातो. लहान खडे बहुतेकदा जास्त द्रव पदार्थांचे सेवन आणि वेदना कमी करून नैसर्गिकरित्या निघून जातात. मोठ्या खड्यांन्ना लिथोट्रिप्सी (शॉक वेव्ह थेरपी) किंवा एंडोस्कोपिक पध्दतीने काढले जाते. गंभीर प्रकरणांमध्ये, मूत्रपिंडाचे कार्य पुनर्संचयित करण्यासाठी मिनीमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.
मूतखडा टाळण्यासाठी या टिप्सचे पालन करा
दिवसाला कमीत कमी 3 लिटर पाणी पिऊन हायड्रेटेड राहावे, मीठाचे सेवन मर्यादित करणे, प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन टाळणे,ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा, लिंबूवर्गीय फळं आणि फायबर यांचाही रोजच्या आहारात समावेश करा ज्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते.शर्करायुक्त आणि कार्बोनेटेड पेयांचे सेवन टाळा. चयापचय आणि किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज व्यायाम करा.अशारितीने तरुणांनी त्यांच्या मूत्रपिंडाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आणि ते योग्यरित्या कार्य करत असल्याची वेळोवेळी खात्री करणे गरजेचे आहे
- डॉ. पवन रहांगडाले, युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )






















