HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका, उपाययोजनेसाठी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक
HMPV Virus : केंद्र आणि राज्य सरकार या नव्या व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलत आहेत. त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे.
मुंबई : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या HMPV या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं असून मंगळवारी त्यासंबंधी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. जनतेने घाबरून जाऊ नये, या व्हायरससंबंधी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भारतात HMPV चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर असून आरोग्य विभागाने त्या संबंधी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीमध्ये HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार आहे. सर्वसामान्यांमध्ये कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी नेमक्या कोणत्या बाबी अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
HMPV व्हायरसची लक्षणं काय?
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) या नव्या व्हायरसचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये कोरोनासदृश्य लक्षणं दिसून येतात. या व्हायरसमुळे रुग्णात अत्यंत साधारण लक्षणं दिसतात. रुग्णामध्ये खोकला किंवा घसा खवखवणं, सर्दी किंवा नाक वाहाणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारखी लक्षणं दिसतात. प्रामुख्यानं लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती या व्हायरसच्या विळख्यात अडकतात. तसेच, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराची गंभीर लक्षणं दिसू शकतात.
लागण टाळण्यासाठी काय करावं?
- खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं?
- खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
- टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
- आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
ही बातमी वाचा :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )