Health Tips : मुलांना सतत दूध देताय? वेळीच सावध व्हा; 'हे' असू शकतं बध्दकोष्ठतेचं कारण
Health Tips : बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, शरीरात फायबरची कमतरता, तेलकट पदार्थांचे सेवन, आहारातील मैद्याचे पदार्थ यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या वाढते.
Health Tips : बद्धकोष्ठता म्हणजे शौचास होताना त्रास होणे, शौचास अनियमितता असणे आणि कडक शौच असल्याने आणखी त्रास होणे. दिवसातून एकदा किंवा एकापेक्षा कमी वेळा शौचास होणं नाॅर्मल असते, पण जर शौच कडक होत असेल आणि शौच होण्यास अनियमितता असेल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
बदलती जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, शरीरात फायबरची कमतरता, तेलकट पदार्थांचे सेवन, आहारातील मैद्याचे पदार्थ यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या वाढते. शाळेत जाणारी मुले काय आणि किती प्रमाणात खातात, त्यांचे पोट नीट साफ होते का याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे.
या संदर्भात, डॉ. सीमा जोशी (वरिष्ठ बालरोगतज्ञ आणि समुपदेशक, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे) सांगतात की, आजकाल मुले टीव्ही, स्मार्टफोन आणि व्हिडीओ गेम्समध्ये जास्त वेळ घालवतात. ज्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली कमी होतात, व्यायाम होत नाही. घाईघाईने सकाळच्या नित्यक्रमामुळे किंवा शाळेतील शौचालयाचा झटपट वापर, बराच वेळ मल धरून राहणे किंवा द्रवपदार्थाचे सेवन कमी करणे ही देखील बद्धकोष्ठतेची काही कारणे असू शकतात. आहारात दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा अधिक समावेश असणे, बाटलीने दूध पाजणे, आहारात तंतुमय पदार्थाचा अभाव, कृत्रिम दूध पावडरचा वापर अशी काही बद्धकोष्ठतेची इतर कारणे आहेत.
सतत पोटात दुखणे, शौच्छास घट्ट आणि कडक होणे ही बद्धकोष्ठतेची लक्षणे आहेत. याव्यतिरिक्त मल विसर्जन करताना होणाऱ्या वेदना, पोटदुखी, मुलांच्या अंतर्वस्त्रात होणारे शौच. मलावाटे रक्त येणे हे देखील एक चिंताजनक लक्षण आढळून येऊ शकते.
बद्धकोष्ठतेवर उपाय काय?
- मुलांना रोज सकाळी रिकाम्या पोटी 4-5 भिजवलेले मनुके खायला द्या. यामुळे पोटही वेळेत साफ होईल.
- गॅसची समस्या असल्यास रात्री झोपताना त्यांच्या पोटावर हिंगाने मालिश करा. मालिश करताना घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने आणि हलक्या हाताने मालिश करा.
- पुरेसे प्रमाणात पाणी न प्यायल्याने मुलांना बद्धकोष्ठतेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मुलांना भरपूर पाणी प्यायल्या द्या.
- त्याचबरोबर दररोज तांदळाची पेज, फळांचा रस, नारळपाणी, भाजांचे सूप, ताक, लिंबू पाणी यांचाही आहारात समावेश करा असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.
मुलांना योग्य वयातच पॉटी ट्रेनिंगची सवय लावा
एका ठराविक वेळेनंतर मुलांना शौचाला जाण्याच्या सवयी लावायला हव्यात. यामुळे बाळाच्या शरीराला वेळीच शी करण्याची सवय लागते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. यासाठी मुलांना योग्य वयातच शौचास बसण्याची सवय लावणे गरजेची आहे. तुमचे मूल अंदाजे 18 महिने ते 3 वर्षांचे झाल्यानंतर तुम्ही पॉटी ट्रेनिंगची सुरुवात करू शकतात. पॉटी ट्रेनिंगची वेळ प्रत्येक मुलानुसार बदलू शकते.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटर्नल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शाह म्हणाले की, बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करणाऱ्या मुलांच्या आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मैदा, ब्रेड, बिस्किट, तेलकट पदार्थ आणि जंक फूडचा समावेश नसेल याची खात्री करा. मुलांच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा आणि त्याचे प्रमाण वाढवा. शौचाला दिवसातून किमान तीनदा तरी जायला हवे. शौचास झाले नाही तरी मुलांना शौचास बसविणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांना योग्य वयातच टाॅयलेट ट्रेनिंग द्या. मुलांचा स्क्रिन टाईम कमी करुन मैदानी खेळ, शारीरिक हालचाली आणि व्यायामाकडे लक्ष द्या. जेवताना मोबाईल अथवा टिव्ही अशी कोणतीही स्क्रिन न दाखवता खाऊ द्या जेणेकरुन आहारावर लक्ष केंद्रित करता येईल. सतत पोटात दुखणे, शौच्छास घट्ट आणि कडक होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या. मुलांना जास्त दूध देऊ नका. मूल जितके जास्त दूधाचे सेवन करतील तितकी त्याची पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा कमी होईल. आणि त्यांना सतत पोट भरल्यासारखे वाटेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )