(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनो रक्तातील ग्लुकोज पातळी संतुलित राखायचीय? मग, ‘या’ 4 महत्त्वाच्या टिप्स नक्की वाचा!
Health Tips : भारतीयांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारत हा प्रौढ मधुमेही लोक असलेला जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे.
Health Tips : भारतीयांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण सर्वाधिक आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) नुकतेच केलेल्या संशोधनानुसार भारत हा प्रौढ मधुमेही लोक असलेला जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि जगातील प्रत्येक सहावी मधुमेह असलेली व्यक्ती भारतीय आहे. गेल्या तीन दशकांमध्ये देशात मधुमेह असलेल्या लोकांच्या संख्येत 150 टक्के वाढ झाली आहे मधुमेहाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात असली, तरी हायपोग्लायसेमियाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.
रक्तातील कमी ग्लुकोज पातळीप्रती प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया भिन्न असली, तरी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होण्याची सामान्य लक्षणे आहेत. चिंताग्रस्त होणे, घाम येणे, थंडी वाजून येणे, चिडचिड किंवा अधीरता, जलद हृदयाचे ठोके, हलक्या स्वरूपात डोकेदुखी किंवा चक्कर येणे, ही काही मुख्य लक्षणे आहेत . गंभीर प्रकरणांमध्ये रूग्णांना विचलित, सुन्न, तंद्री आणि अंधुक दृष्टी किंवा बोलण्यात अडचण अशी लक्षणे जाणवू शकतात.
तज्ज्ञ म्हणतात...
डायबेटोलॉजिस्ट डॉ. सुहास एरंडे म्हणतात की, ‘हायपोग्लायसेमिया ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये तुमच्या रक्तातील शर्करेची (ग्लुकोज) पातळी प्रमाणित श्रेणीपेक्षा कमी असते. प्रत्येक व्यक्तीची ग्लुकोजची पातळी कमी झाल्यावर वेगवेगळी लक्षणे दिसतात. त्यामुळे, तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होत आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्लुकोजचे सतत निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. आज प्रिक फ्री वेदनारहित ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणे आहेत, जी ग्लुकोजच्या ट्रेंडवर रिअल-टाइम माहिती सादर करतात, व्यक्तीच्या ग्लायसेमिकमध्ये 24 तासांमध्ये होणारे बदल दाखवतात.’
मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसून येणार नाहीत, पण इतर अनेकांना ती लक्षात देखील येत नाहीत, ज्यामुळे रक्तातील कमी झालेल्या ग्लुकोज पातळ्यांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक होऊन जाते. तसेच, स्थिती अधिक खालावून वैद्यकीय आपत्ती येऊ शकते. हायपोग्लायसेमियाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
15-15चा नियम
या नियमामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट सेवन करून, 15 मिनिटांनंतर ते तपासणे आवश्यक आहे. ग्लुकोजची पातळी सामान्य श्रेणीत आणण्यासाठी फळे, साखरयुक्त पदार्थ किंवा नियमित सोडा, मध लिंबू पाणीसारखी पेये सेवन करता येऊ शकतात. तुमच्या रक्तातील शर्करेची पातळी सुधारत नसेल, तर त्वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.
आहार चुकवू नका
हायपोग्लायसेमिया विकसित होण्याची सर्वात सामान्य परिस्थिती म्हणजे जेवण चुकणे. म्हणून, योग्य वेळेत जेवण घेणे महत्वाचे आहे, ज्यामुळे हायपोग्लायसेमियाला प्रतिबंध होईल. याव्यतिरिक्त भारतात केलेल्या एका संशोधनानुसार कामकाजाच्या व्यस्त वेळापत्रकांच्या कारणास्तव जेवणाच्या वेगवेगळ्या वेळांमुळे महिलांना हायपोग्लायसेमिया होण्याचा धोका जास्त असतो, असे आढळले आहे. म्हणून, मधुमेही वृद्ध महिलांना वेळेवर जेवण देण्याबाबत रुग्णांना तसेच, कुटुंबातील सदस्यांना शिक्षित करणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे हायपोग्लायसेमियाला प्रतिबंध होण्यास मदत होईल.
नियमित ग्लुकोज पातळ्यांची तपासणी करा
मधुमेह व्यवस्थापनासाठी नियमित ग्लुकोज तपासणी करणे आवश्यक आहे. सेन्सर-आधारित सीजीएम उपकरणे आहेत, जी ग्लुकोजच्या पातळीची माहिती देतात, त्यामुळे रक्तातील ग्लुकोज पातळी कमी झाल्यास रुग्णाला त्याबाबत माहिती मिळते. रक्तातील ग्लुकोजच्या पातळीची तपासणी केल्याने प्रभावी व्यवस्थापनासाठी आहार व्यवस्थापन, व्यायाम या नित्यक्रमाने मधुमेह असताना देखील उत्तम जीवनशैली राखण्यास मदत होते.
डायबेटोलॉजिस्टकडे जाण्यास विसरू नका!
हायपोग्लायसेमियासाठी नियमित सल्लामसलतीकडे दुर्लक्ष करू नका. रक्तातील शर्करेचे प्रमाणे सामान्य असले तरी डॉक्टरांची नियमित भेट घ्या. मधुमेही व्यक्तींच्या साखर पातळीत बदल होऊ शकतात, ज्यामुळे डायबेटोलॉजिस्ट्सना रक्तातील प्रमाणित शर्करा पातळी संतुलित ठेवण्यासाठी उपचाराबाबत नव्याने विचार करावा लागू शकतो. उपचार प्रत्येक रूग्णानुसार वेगळा असतो आणि स्थितीच्या तीव्रतेनुसार देखील वेगळा असू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : भिजवलेल्या बदामाचे 'असेही' आहेत फायदे; जाणून घ्या
- Health Care Tips : वारंवार केसगळतीचा त्रास होतोय? मग रोज या 5 बिया नक्की खा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )