Gatari Amavasya : आज गटारी अमावस्या, उद्यापासून सुरु होतोय श्रावण, जाणून घ्या मुहुर्त, असं करा व्रत
Gatari 2021 Dates: श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे गटारी साजरी करण्याचा दिवस. या दिवशी गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या असते.
Gatari 2021 Dates: श्रावण महिन्याची सुरुवात होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे गटारी साजरी करण्याचा दिवस. या दिवशी गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या असते. हिंदू धर्मात विशेष महत्व असलेला श्रावण महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा महिना असतो. पूजा पाठ करण्यासाठी या महिन्याला विशेष महत्व आहे. यामुळं श्रावण महिन्यात मांसाहारी खाणपान टाळलं जातं. त्यामुळे श्रावण महिना पाळणारी मांसाहारी मंडळी मास सुरु होण्यापूर्वी मांसाहारावर मस्त ताव मारतात. यानिमित्ताने गटारी सेलिब्रेट केली जाते.
यंदा गटारी अमावस्येला रविवार देखील आला आहे. आज रविवारी 8 ऑगस्ट रोजी गटारी साजरी होतेय. यामुळं मांसाहार प्रेमींची गर्दी मांस, मच्छी घेण्यासाठी ठिकठिकाणी झाली आहे. ही आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही साजरी होते. या दिवशी घरातील दिवे घासून पुसून लख्ख केले जातात. ते लावून त्यांची पूजा केली जाते. ही आषाढी अमावस्या शनिवार, 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.11 मिनिटांनी सुरु होत असून रविवार, 8 ऑगस्ट रोजी 7.19 मिनिटांनी संपणार आहे.
अमावस्या व्रत (Hariyali Deep Sawan Amavasya Puja)
श्रावण मासाच्या सुरुवातीच्या आधीची ही अमावस्या हरियाली अमावस्या, दीप अमावस्या आणि श्रावणी अमावस्या या नावानं देखील ओळखली जाते. पंचांगानुसार दीप अमावस्येचं व्रत आज केलं जाऊ शकतं. या दिवशी पिंडदान आणि तर्पण करणं शुभ मानलं आहे. आज शेतीतील साधनांचं पूजन देखील केलं जातं. या अमावस्येच्या निमित्तानं हिरवळीला महत्व देण्यात आलं आहे. वृक्षांचं महत्व यात अधोरेखित केलं आहे.