Manoj Jarange Patil Marathi Movie : मनोज जरांगे पाटील विरुद्ध मनोज जरांगे पाटील; रुपेरी पडद्यावर रंगणार सामना, नेमकं काय आहे प्रकरण?
Manoj Jarange Patil Marathi Movie : मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटावर आधारीत असणारे दोन चित्रपट आता एकाच दिवशी रिलीज होणार आहेत.
Manoj Jarange Patil Marathi Movie : एखाद्या विषयावर एकहून अधिक चित्रपट प्रदर्शित होत असतात. मराठी सिनेसृष्टीतही असे काही वेळेस झाले आहे. मराठी सिनेसृष्टीत एकाच वेळी विविध जॉनरचे पाच ते सात चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. आता, चित्रपटगृहात एकाच व्यक्तीचा जीवनपट उलगडून दाखवणारे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवनपटावर आधारीत असणारे दोन चित्रपट आता एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. 'संघर्षयोद्धा...मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) आणि 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हे दोन चित्रपट जरांगे पाटील यांच्यावर आधारीत आहेत. हे दोन्ही चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी 'संघर्षयोद्धा...मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित होणार होता. पण, आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीज डेट एक आठवडा आधी केली आहे.
'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचा टीझर गुरुवारी (30 मे रोजी) लाँच करण्यात आला. या टीझरनुसार हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे हे या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहे. तर, 'संघर्षयोद्धा...मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट आधीच रिलीज होणार होता. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 21 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, 'आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाच्या टीझर लाँच नंतर आता या संघर्षयोद्धा चित्रपटाने आपली रिलीज डेट आता एक आठवडा आधीच जाहीर केली आहे.
मनोज जरांगे यांच्यावरील चित्रपट आधी बॅक टू बॅक आठवड्यात रिलीज होणार होते. आता मात्र, दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्याने कोणत्या चित्रपटाला अधिक प्रतिसाद मिळणार, याकडेही सिनेरसिकांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये मनोज जरांगे यांचा जीवनपट, मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष, उपोषण आदी घटना असणार आहेत.
कोणत्या चित्रपटात कोणते कलाकार?
'संघर्षयोद्धा... मनोज जरांगे पाटील' या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेते मोहन जोशी, संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे आदी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे.