Brahman Bhushan Puraskar: अभिनेते प्रशांत दामले यांना "ब्राह्मण भूषण" पुरस्कार जाहीर; मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन होणार सन्मान
अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार (Brahman Bhushan Puraska) जाहीर करण्यात आला आहे.
Brahman Bhushan Puraskar: आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने ब्राह्मण भूषण पुरस्काराचे (Brahman Bhushan Puraskar) आयोजन दरवर्षी केले जाते. यंदा सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी माहिती दिली.
व्यावसायिक नाटकांच्या 12 हजार पाचशेंहून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केलेले विश्वविक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी मिळाली आहे, या पार्श्वभूमीवर त्यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार हा पुरस्कार जाहीर करत असल्याचे भालचंद्र कुलकर्णी आणि संजय ओर्पे यांनी सांगितलं. मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभामध्ये प्रसिद्ध मुलाखतकार राजेश दामले हे प्रशांत दामले यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
6 मे 2023 रोजी (शनिवार) 5.30 वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज सभागृहात होणाऱ्या समारंभात इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार साहित्यिक व पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांना, डॉ. रामचंद्र देखणे युवा कीर्तनकार पुरस्कार सौ. मानसी बडवे यांना आणि भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, पुणे या शतकमहोत्सवी संस्थेला देण्यात येणार आहे. रोख बक्षिस, शाल आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण चितळे (अध्यक्ष, महाराष्ट्र चित्पावन संघ) तर डॉ. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी) हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर (2013), अ.भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी (2014), एअर मार्शल भूषण गोखले (2015), पं. वसंतराव गाडगीळ (2016), पितांबरीचे श्री. रविंद्र प्रभुदेसाई (2017), पौरोहित्यांचे संघटन करणाऱ्या श्रीसद्गुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत कुलकर्णी (2018), सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे (2019) आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे (2022) यांना ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रशांत दामलेंनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाची बस सुसाट सुटली. प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Prashant Damle: 'ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची'; प्रशांत दामले यांची खास पोस्ट