एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'दहा लाखाचा धनी' गेला, ‘बालरंगभूमीचे जनक’ श्रीनिवास शिंदगींचं निधन
श्रीनिवास शिंदगी यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक बालनाट्ये गाजली.
सांगली: बालरंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास शिंदगी यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. ते 89 वर्षाचे होते. गेल्या 60 वर्षपासून श्रीनिवास शिंदगी यांनी बालनाट्य चळवळ अविरत चालू ठेवली होती. या चळवळीच्या माध्यमातून शेकडो बाल कलाकारांना अभिनयाचे आणि दिग्दर्शनाचे धडे दिले होते.
शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी त्यांना ‘बालरंगभूमीचे जनक’ अशी उपाधी दिली होती.
शिंदगी यांनी अनेक कथा, कविता, नाटके, स्फूट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. शिंदगी यांनी बालकुमार साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. नटवर्य केशवराव दाते यांच्या प्रेरणेने शिंदगी यांनी सांगली येथे आद्य बाल रंगभूमीची स्थापना केली.
बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आहे. मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा टेपरेकॉर्डरच्या सहायाने पार्श्वसंगीत देण्याचा प्रयोग शिंदगी यांनीच केला. त्यांच्या 'पुंगीवाला' बालनाट्याचे शेकडो प्रयोग झाले आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन सुलभा देशपांडे यांनी केले होते. पुंगीवाला हे बालनाट्य मुंबई दूरदर्शनवर प्रसारित होणारे पहिले बालनाट्य ठरले.
शिंदगी यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक बालनाट्ये गाजली.
शिंदगी यांच्या मार्गदर्शनाखाली बालवयात अभिनयाचे धडे घेतलेले अनेकजण पुढे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणू नावाजले गेले.
'दहालाखाचा धनी' या नाटकाच्या वेळी शिंदगी यांनी टेपरेकॉर्डरच्या सहाय्याने संगीत या आधुनिक तंत्राचा पहिल्यांदा वापर केला. प्रख्यात अभिनेत्री आणि सौंदर्याचा आयटमबॉम्ब म्हणून ज्यांनी रंगभूमीवर व चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली त्या पद्मा चव्हाण यांनी रंगमंचावर पहिली एन्ट्री याच नाटकातून घेतली होती हे विशेष.
साहित्य, लेखन, अभिनय याचबरोबर श्रीनिवास शिंदगी यांनी देशभक्तीचे बाळकडू लहान मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी गीतभारतम, हमारा वतन, वंदेमातरम हे राष्ट्रभक्तीपर गीतांचे कार्यक्रम तयार करून त्यांचे शेकडो प्रयोग राज्यभर केले आहेत.
या कार्यक्रमाच्या ध्वनीफितीही तयार करण्यात आल्या आहेत. याबरोबरच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एक मुंगी नेसली लुंगी, जंगलगाणी, मिठाईचे घर, गणपतीबाप्पा क्रिकेट खेळूया याही ध्वनिफितींची त्यांनी निर्मिती केली.
शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत ‘भूमिपुत्रांचे वनपूजन' हे संगीतमय बालनाट्य लिहिले. या बाल नाट्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
गोवा- मुक्ती संग्रामातील क्रांतीकाराकांना त्यांनी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याबरोबरच सुधीर फडके यांच्या गीतारामायणाचा पहिला प्रयोग त्यांच्या सहकार्यामुळेच सांगलीच्या पांजरपोळ सभागृहात सादर करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement