Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अजित पवार यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, 'बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?'; प्रोमो व्हायरल
‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) हजेरी लावणार आहेत.
Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम 4 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे उपस्थित राहणार आहे. नुकताच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे हे प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
‘खुपते तिथे गुप्ते ’या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, राज ठाकरे यांना अजित पवार यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणतात, 'एकदा त्यांनी 14 आमदार निवडून आणले होते, ते सगळी लोक त्यांच्यापासून दूर गेलेले आहेत. ' अजित पवार यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली, 'मी आता खरं बोलणार होतो, ए गप रे... अजित पवार हे स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं तरी काय होईल? '
पाहा प्रोमो
View this post on Instagram
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राज ठाकरे यांना कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहेत? हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 4 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वी 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमातील प्रश्नांना खूप धार आहे, पण मी पण तयार आहे.' या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं होतं, "प्रश्नांना कितीही असो धार माननीय मुख्यमंत्री आहेत तयार."
संबंधित बातम्या