Ramayan Fame Lalita Pawar Tragic Life: 'रामायणातल्या मंथरा'नं आयुष्यभर सोसलं दुःख, पतीनं दिला धोका, सख्ख्या बहिणीनंच उद्ध्वस्त केलं घर; मृत्यूनंतरही नशीबी यातनाच
Ramayan Fame Lalita Pawar Tragic Life: ललिता पवार यांनी अनेक भूमिका साकारल्या पण, त्यांनी साकारलेली 'रामायण' मालिकेतील मंथराची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.

Ramayan Fame Lalita Pawar Tragic Life: इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार आहेत, काही अगदी टॉप सेलिब्रिटींच्या यादीत सहभागी होतात, तर काही अगदी छोट्याशा भूमिका करतात, पण कायमची प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. अनेक कलाकारांनी तर अगदी नकारात्मक भूमिका साकारुन सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. असंच एक नाव म्हणजे, दिग्गज अभिनेत्री ललिता पवार. हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Movies) सर्वात क्रूर आणि निर्दयी खलनायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललिता पवार आजही त्यांच्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखल्या जातात. ललिता पवार (Lalita Pawar) यांना रागिट आणि सर्वात क्रूर सासू म्हणूनही ओळखलं जायचं.
'रामायण' (Ramayan) मालिकेतील मंथराची भूमिका ललिता पवार यांनी अजरामर केली आणि त्या घराघरात पोहोचल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. त्यांनी नकारात्मक भूमिका एवढ्या प्रखरपणे साकारल्या की, त्या काळची लेडी व्हिलन म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं.
नकारात्मक भूमिका त्या एवढ्या प्रभावीपणे साकारायच्या की, लोकांना त्या खऱ्या आयुष्यातही एवढ्याच क्रूर असतील, असंच वाटायचं. ललिता पवार यांनी अनेक भूमिका साकारल्या पण, त्यांनी साकारलेली 'रामायण' मालिकेतील मंथराची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. ललिता पवार यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत मंथराची भूमिका साकारलेली. खरंतर मंथराच्या भूमिकेनंच ललिता पवार यांना इंडस्ट्रीत लेडी व्हिलन म्हणून प्रस्थापित होण्यास मदत केली. ललिता यांनी 'चतुर सुंदरी' सिनेमात 17 वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या. पण, तुम्हाला माहितीय, इंडस्ट्री खलनायिका म्हणून नावारुपाला आलेल्या ललिता पवारनं कधीकाळी नायिका होण्याचं स्वप्न पाहिलेलं. पण, असं काय घडलं की, हिरोईन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ललिता इंडस्ट्रीच्या टॉपच्या खलनायिका झाल्या?

एका घटनेनं ललिता यांचं स्वप्न भंगलं
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये जन्मलेल्या ललिता यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांच्या पालकांनी तिच्या अभिनयाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. वयाच्या नवव्या वर्षी राजा हरिश्चंद्र या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तेव्हापासून ललिता यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण, नायिका बनण्याचं स्वप्न उरी बाळगलेल्या ललिता पवार कधीच नायिका बनू शकल्या नाहीत. 1942 मध्ये जंग-ए-आझादी या सिनेमाच्या शुटिंगवेळी झालेल्या अपघातानं त्यांचं संपूर्ण आयुष्य पालटलं.
एका सह-अभिनेत्यानं ललिता यांना एवढ्या जोरात मारलं की, त्यांच्या डाव्या डोळ्यांतली नस फाटली. ललिता यांना फेशिअल पॅरालिसेस झाला. ललिता यांच्यावर तब्बल तीन वर्ष उपचार सुरू होते. या अपघातातून बरं होण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्या बराच काळ अभिनयापासून दूर राहिल्या. त्यांचा डावा डोळा गेल्यामुळे त्यांना मुख्य भूमिका सोडून इतर भूमिका साकारण्यास भाग पाडलं गेलं. पण, नशिबात वेगळंच होतं, ललिता पवार यांच्या त्याच भूमिकांनी त्यांना स्टार बनवलं. मंथरा या त्यांच्या भूमिकेनं त्यांना इंडस्ट्रीत खलनायिका म्हणून पाय रोवण्यास मदत केली. त्यांनी 70 वर्षांत सुमारे 700 सिनेमांमध्ये काम केलं. सर्वाधिक काळ अभिनय केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ललिता यांचं नाव नोंदवलेलं.

सख्खी बहिणीच झाली वैरी, उद्ध्वस्त केला संसार
ललिता यांचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या फिल्मच्या स्क्रिप्टसारखंच होतं. त्यांच्या सख्ख्या बहिणीनंच त्यांचा संसार मोडला. ललिता यांचा पहिला पती गणपत राव याचे ललिता यांच्या सख्ख्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच ललितानं स्वतः पतीला सोडलं. त्यानंतर ललिता यांनी निर्माते राजप्रकाश गुप्ता यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांचा मुलगा जय पवार देखील निर्माते बनले. आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देऊनही, ललिता यांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही अडचणींचा सामना करावा लागला.
त्यांना तोंडाच्या कर्करोगाचं निदान झालं, ज्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर पुण्यात राहावं लागलं, जिथे त्या एकट्याच राहत होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या शेवटच्या क्षणी कोणीही त्यांच्यासोबत नव्हतं. ललिता यांचा मृतदेह तीन दिवस खोलीत पडून होता. शेवटच्या क्षणी त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























