Dussehra 2022: अरविंद त्रिवेदी ते सैफ अली खान; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारलीये ‘रावणा’ची भूमिका
Dussehra 2022: अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी ‘रामायण’ मालिकेत साकारलेली रावणाची भूमिका ही आजपर्यंत गाजलेली विशेष भूमिका आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांनी पडद्यावर रावणाची भूमिका साकारलीय...
![Dussehra 2022: अरविंद त्रिवेदी ते सैफ अली खान; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारलीये ‘रावणा’ची भूमिका Dussehra 2022 special actors list who played ravana on screen Dussehra 2022: अरविंद त्रिवेदी ते सैफ अली खान; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारलीये ‘रावणा’ची भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/05/c39104369dd9543e7bec0a384bd5d9c41664949980638373_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dussehra 2022: आज देशभरात मोठ्या उत्साहात विजयादशमी अर्थात दसरा (Dussehra 2022) साजरा केला जात आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या सणाबद्दल यावेळी सर्वांमध्येच उत्साह पाहायला मिळत आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच हा सण कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा केला जात आहे. एकीकडे दसऱ्याची धूम सुरू असताना दुसरीकडे ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खानही चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्याच्या लूकमुळे चित्रपट चर्चेत आला आहे. तर, सैफ अली खानची तुलना आता ‘रावण’ साकारलेल्या इतर कलाकारांशी होत आहे. अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी ‘रामायण’ मालिकेत साकारलेली रावणाची भूमिका ही आजपर्यंत गाजलेली विशेष भूमिका आहे. चला तर, जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांनी पडद्यावर रावणाची भूमिका साकारलीय...
अरविंद त्रिवेदी
पडद्यावर ‘रावण’ साकारणाऱ्या कलाकारांच्या या यादीत अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे नाव प्रथम येते. रामानंद सागर यांच्या रामायणात अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकारली होती. एकीकडे लोकांनी अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलियाला राम आणि सीतेच्या रूपात प्रेम दिले होते, तर दुसरीकडे लोक अरविंद यांचा खऱ्या आयुष्यातही ‘रावण’ मानून तिरस्कार करू लागले होते. त्यांच्या इतकी ही भूमिका उत्तमरीत्या कुणीही साकारू शकलेलं नाही.
पारस छाबरा
‘बिग बॉस 13’चा स्पर्धक पारस छाबरा हा देखील रावणाच्या भूमिकेत दिसला होता. ‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत पारसने रावणाची भूमिका साकारली होती. मात्र, त्यांच्या पात्राला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
आर्य बब्बर
अभिनेता आर्य बब्बर त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने रावणाच्या पात्रातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. अभिनेता आर्य बब्बरने ‘संकटमोचन महाबली हनुमान’ या टीव्ही शोमध्ये रावणाची भूमिका साकारली होती. आर्य बब्बरने साकारलेल्या रावण पात्राला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
तरुण खन्ना
अभिनेता तरुण खन्ना याने प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकांपैकी एक असलेल्या ‘देवो के देव महादेव’मध्ये शिवभक्त रावणाची भूमिका साकारली होती. ही मालिका भगवान महादेवांवर आधारित होती. मात्र, रावणाची भक्ती दाखवताना यात रामायणाचे काही भाग दाखवण्यात आले होते.
सचिन त्यागी
टीव्ही अभिनेता सचिन त्यागीनेही छोट्या पडद्यावर रावणाची भूमिका साकारली आहे. 'रामायण- जीवन का आधार' या टीव्ही मालिकेमध्ये सचिनने रावणाची भूमिका साकारली होती. पडद्यावर अनेकदा सकारात्मक भूमिका साकारणारा सचिन ‘रावणा’च्या भूमिकेमुळे चर्चेत आला होता.
सैफ अली खान
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच रावणाची भूमिका साकारणार आहे. आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात ती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफचा लूक इतर कलाकारांपेक्षा एकदमच वेगळा असल्याने तो सध्या ट्रोल देखील होत आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)