आदल्या रात्री सुशांत-रिया भेटले होते?, प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीने सुशांत प्रकरणाला कलाटणी
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण कमालीचं गुंतागुंतीचं झालं आहेगुरुवारी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या साक्षीने मात्र या सुशांतसिंह प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण कमालीचं गुंतागुंतीचं झालं आहे. एकीकडे अनेकांच्या जबान्या घेतल्यावर सीबीआय आपल्या शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचलं असतानाच अनेक नव्या साक्षीदारांमुळे या शेवटच्या निर्णयाआधी ही केस पुरती नवी वळणं घेताना दिसू लागली आहे. गुरुवारी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या साक्षीने मात्र या सुशांतसिंह प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
सीबीआयची टीम सध्या दिल्लीत पोहोचली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने सीबीआय तपास करू लागली आहे. अशात एका प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीने आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या साक्षीनुसार सुशांतच्या मृत्यूआधी एक दिवस म्हणजे 13 जूनच्या रात्री रिया आणि सुशांत एकमेकांना भेटले होते. एका पार्टीचं आयोजन झालं होतं. तिथे रिया आणि सुशांत एकमेकांना भेटले. त्यानंतर पार्टी बराच वेळ चालली. ही पार्टी झाल्यानंतर पहाटे साधारण 2 ते 3 च्या सुमारास रियाला सुशांतने तिच्या घरी सोडलं. आपण पहाटे दोन ते तीनच्या सुमारास रियाच्या घरासमोर सुशांत आणि रियाला पाहिल्याचं तो साक्षीदार सांगतो. सुशांतने रियाला ड्रॉप केलं आणि तो निघून गेला. असं असेल, अनेक प्रश्न उपस्थित होतात.
रिया आणि सुशांतमध्ये वाद झाल्यानंतर रियाने सुशांतचा फ्लॅट 8 जूनला सोडला. त्यानंतर 9 जूनपासून तिने सुशांतचा फोन नंबर ब्लॉक केला होता असं ती म्हणते. मग या पार्टीबद्दल आणि सुशांत-रियाला एकत्र आणण्याबद्दल मध्यस्थ म्हणून कोणी काम केलं? सुशांतला पार्टीच्या निमित्ताने विशिष्ट ठिकाणी रियाच्या मदतीने बोलावणं हा हेतू होता का? असं असेल तर ही पार्टी कुठे झाली? सुशांत रियासोबत पार्टीत असताना सुशांतच्या फ्लॅटवर कोणी येऊन थांबलं होतं का? कारण, सुशांतच्या फ्लॅटवर असलेला सिद्धार्थ पिठानी याच्या जबाबानुसार 14 जूनच्या मध्यरात्री 1 वाजता सुशांत सिद्धार्थच्या खोलीत आला आणि त्याने मी आलोय आणि तू झोप असं सांगितल्याचं सिद्धार्थ म्हणतो. असं असेल तर प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार त्याने सुशांत आणि रियाला 2 च्या आसपास रियाच्या घरासमोर पाहिलं आहे. मग खरं काय? हा साक्षीदार कोण आहे.. हे गुलदस्त्यात आहे. पण सीबीआय सूत्रांनी मात्र आता ही माहिती दिली आहे. ही साक्ष खरी आहे की नाही हेही पडताळून पाहिलं जात आहे. त्यासाठी सुशांत आणि रियाची त्या दिवसाची सेलफोन लोकेशन्स शोधून काढावी लागणार आहेत. शिवाय त्या पार्टीत आणखी कोण होतं, हे शोधून त्यांनाही यात जबाब द्यावा लागेल असं दिसतं.
सुशांतच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुशांतच्या घरी कोणतीच पार्टी झाली नाही. कारण, त्याच्या घराचे दिवे रात्री लवकर बंद झाले होते. केवळ स्वंयपाक घराचे लाईट्स चालू होते. मग या घरात कोण होतं? असे अनेक सवाल आता पुढे आले आहेत. रिया आणि सुशांतमध्ये जर झगडा झाला होता तर रियाने सुशांतला कुणाच्या पार्टीत बोलावलं होतं? रियाने इन्स्टावर तशी पोस्टही टाकली आहे. पोस्ट कोव्हिड पार्टीचा संदर्भ घेत तिने इन्स्टावर ही पोस्ट टाकली आहे. त्यात असलेलं लोकेशन नक्की कुणाचं आहे यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एकीकडे 12 जूनला श्रुती मोदीच्या इन्स्टा पोस्टवर असलेले केकचे फोटो.. त्यानंतर रियाचा 13 जूनला असलेला पार्टीचा फोटो.. सुशांत रिया भेटीची आलेली साक्ष आणि या धर्तीवर सिद्धार्थ पिठानीने यापूर्वी दिलेले जबाब आता पुन्हा एकदा सीबीआयला पडताळून पाहावं लागणार आहे. पण सुशांत रियाच्या भेटीच्या प्रत्यक्षदर्शीनंतर या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे हे नक्की.