Santosh Juvekar: 'मी तिकडे बघितलंच नाही, बघूच शकलो नाही...'; अक्षय खन्नाबाबतच्या जोरदार ट्रोलिंगनंतरही संतोष जुवेकरनं उच्चारलं पुन्हा तेच वाक्य
Santosh Juvekar Comment On Trolling: 'छावा' सिनेमावेळी दिलेल्या मुलाखतीतल्या एका वक्तव्यामुळे संतोष जुवेकर जोरदार ट्रोल झाला. त्याच्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती.

Santosh Juvekar Comment On Trolling: मराठी सिनेसृष्टी (Marathi Movie), मालिकाविश्वातील गुणी अभिनेत्यांचा विषय निघाला की, त्यामध्ये संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हे नाव प्रामुख्यानं सहभागी होतं. आता संतोष जुवेकर मराठी रंगभूमीवरचं (Marathi Theatre) अजरामर नाटक 'घाशीराम कोतवाल'च्या (Ghashiram Kotwal) हिंदी रुपात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच संतोष जुवेकर बॉक्स ऑफिसवर (Box Office) सुपरडुपर हिट ठरलेल्या 'छावा' सिनेमात (Chhaava Movie) दिसलेला. या सिनेमात त्यानं साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. पण, या सिनेमावेळी त्यानं दिलेल्या मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यामुळे मात्र, संतोष जुवेकर जोरदार ट्रोलही झाला. त्याच्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती.
एका मुलाखतीत बोलताना संतोष जुवेकरनं 'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारलेल्या अक्षय खन्नाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्याच्या त्याच वक्तव्यावरुन त्याला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्यानंतर संतोषवर अनेक मीम्स व्हायरल करण्यात आले. पण, आता बऱ्याच दिवसांनी संतोषनं त्याला ज्या वक्तव्यावरुन ट्रोल करण्यात आलेलं, तेच वक्तव्य पुन्हा केलं आहे. तसेच, त्याला करण्यात आलेल्या ट्रोलिंगवर मजेशीर उत्तरही दिलं आहे.
संतोष जुवेकर नेमकं काय म्हणाला?
नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला की, "या संवादावर माझे कॉपीराइट्स आहेत. पण, मी खऱ्या अर्थाने सांगतोय की, मी तिकडे बघितलंच नाही. मी बघूच शकलो नाही. मी काही हँडल केलं नाही. जे माझ्यावर प्रेम करतात, जे खरोखर मला ओळखतात, ज्यांना मी नेमका कसा आहे, हे खरोखर माहितेय ना, त्या लोकांनीच हे हँडल केलं. मी त्यांना धन्यवाद म्हणेन, आय लव्ह यू म्हणेन... कारण ते सांभाळत आहेत. आपल्यासाठी दुश्मन, निंदक किंवा कौतुक करणारे हे देवच तयार करतो. जेव्हा त्याला कळतं की, याचं जरा अती होतंय. तेव्हा तो एक सैन्य पाठवतो, कव्हर करायला."
संतोषने असे म्हटले की, 'मी खूप सकारात्मक आहे. जर संकट त्याने दिलं असेल, तर त्या संकटातून बाहेर पडायला तोच माणसं पाठवतो.' संतोषने म्हटले की, यावेळी तो त्याचे काम करत राहिला. त्याच्या जवळच्या माणसांनीच सगळं हाताळलं होतं.
'छावा'वरुन संतोष जुवेकर का झालेला ट्रोल?
नेटवर्क 18ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना संतोष जुवेकरनं अक्षय खन्नाबाबत एक वक्तव्य केलेलं. त्याचं हेच वक्तव्य ट्रोलिंगसाठी कारण ठरलेलं. त्यावेळी संतोष जुवेकर म्हणालेला की, "छावा' सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत, त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरू असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलं पण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्यानं उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही. मी तिकडे पाहिलंही नाही..."
संतोष जुवेकरची ही मुलाखत व्हायरल झाल्यानंतर त्याच्या वक्तव्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी फैलावर घेतलं. त्याच्या वक्तव्यावर मीम्स व्हायरल करण्यात आले. "आपला रोल किती आणि आपण बोलतो किती. किती अतिशयोक्ती… अक्षय खन्ना पेक्षा हाच जास्त इंटरव्ह्यू देतोय...", असं एका युजरनं म्हटलेलं. तर, दुसऱ्या एका युजरनं कमेंट करत 'रुबाब केवढा, रोल केवढा', असं म्हटलेलं. तर, तिसऱ्या एका युजरनं 'माझीच लाल मित्रमंडळ.. नुसतीच फुगिरी', अशीही कमेंट केलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























