(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरण, पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या आरोपीचं दुसऱ्यांदा शवविच्छेदन, कोणत्या नव्या रहस्यांचा होणार उलगडा?
Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. दरम्यान यातील एका आरोपीचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आले आहे.
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी एकूण पाच आरोपींनी अटक करण्यात आली होती. त्यापैकी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत अनुज थापन या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली होती. पण अनुज थापन आत्महत्या करू शकत नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. थापनच्या आत्महत्येनंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले होते.
पण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, पंजाबच्या फरीदकोट भागात असलेल्या गुरु गोविंद सिंग मेडिकल कॉलेजमध्ये गुरुवारी थापनच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. अनुजच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, अनुजच्या मृत्यूचे कारण आत्महत्या नसल्याची शंका आहे आणि मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये झालेल्या शवविच्छेदनावर त्यांचा विश्वास नाही. त्यानंतर कोर्टाने कोणतेही भाष्य न करता कुटुंबीयांना विशेषत: अनुजच्या आईचे समाधान करण्यासाठी दुसऱ्या शवविच्छेदनासाठी परवानगी दिली.
पोलीस कोठडीत अनुजचा मृत्यू
अनुजचा मृत्यू मुंबई क्राइम ब्रँचच्या कोठडीत असताना 1 मे रोजी झाला. पोलिसांनी सांगितले की, अनुजने टॉयलेटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तसेच जेजे रुग्णालयाच्या शवविच्छेदनामध्येही त्याचा मृत्यू गळफास लावून झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला अनुजच्या कुटुंबीयांनी मुंबईत येऊनही अनुजचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता. तसेच त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली. मात्र अनुजच्या आईची प्रकृती लक्षात घेऊन त्यांनी अनुजचा मृतदेह पंजाबला नेण्याची तयारी दर्शवली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला
न्यायालयाच्या आदेशानंतर दुसरे शवविच्छेदन
दरम्यान अनुजचे मामा कुलदीप यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, आम्ही दुसरं पोस्टमार्टम करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. त्यानंतर त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आणि अनुजच्या मृतदेहाचे दुसरे पोस्टमॉर्टम झाले.थापनची आई रीता देवी यांच्या याचिकेला सुरुवातीला पंजाब सरकारने विरोध केला, पण नंतर कुटुंबाच्या समाधानासाठी पंजाब सरकारने आपला विरोध मागे घेतला.
मुंबई क्राईम ब्राँचकडून थापनला अटक
थापनला मुंबई क्राईम ब्रँचने सोनू बिश्नोईसह पंजाबमधून अटक केली होती. या दोघांवर सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या सागर पाल आणि विकी गुप्ता या नेमबाजांना बंदूक आणि गोळ्या दिल्याचा आरोप आहे.