राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार आहे.
मुंबई : राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. राज्यात उदयनराजे भोसले, पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजय खेचून आणला. या विजयामुळे हे तिघे ही आता लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतील. भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार आहे.
पियुष गोयल यांची रिक्त झालेली जागा सातारच्या नितीन पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. तर प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झालेल्या जागी कोण उमेदवार असणार याबाबत अद्याप निश्चिती नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेची निवडणूक 26 जूनला पार पडणार आहे. या जागेसाठी समीर भुजबळ, आनंद परांजपे, पार्थ पवार इच्छुक असल्याची माहिती आहे.
लोकसभेची सातारची हक्काची जागा उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपला सोडल्यानंतर अजित पवार गटाच्या वाट्याला राज्यसभेची जागा मिळणार आहे. अजित पवार गटाला पीयूष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. पियूष गोयल हे 2022 साली राज्यसभेवर निवडून आले होते. गोयल विजयी झाल्याने लवकरच ते राज्यसभेचा राजीनामा देतील. गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभा खासदारकीची शिल्लक असलेली चार वर्षे ही अजित पवार गटाच्या उमेदवाराल मिळणार आहे. गोयल यांच्या जागेचे चित्र स्पष्ट आहे. मात्र प्रफुल पटेलांची जागा कोणाला मिळणार याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही.
25 जून राज्यसभा निवडणूक
केरळ आणि महाराष्ट्रातील मिळून चार जागांसाठी 25 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या रिक्त जागेसाठी 25 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जून आणि नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख 18 जून असेल. 25 जून रोजी निवडणूक होईल. तर सायंकाळी मतमोजणी होणार आहे.