Mukesh Khanna : अयोध्येत भाजपचा पराभव, मुकेश खन्ना म्हणाले, 'भव्य मंदिरासोबतच लोकांचाही विचार...'; पण नेटकऱ्यांनीही चांगलच सुनावलं
Mukesh Khanna : अयोध्येतील भाजपच्या पराभवावर अभिनेते मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केलीये.
Mukesh Khanna : 'शक्तीमान' म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. नुकतच त्यांनी यंदाच्या लोकसभेच्या निवडणूक अयोध्येत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी रामानंद सागर यांच्या रामायणातील लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले सुनील लाहिरी यांनीही अयोध्येतील भाजपच्या पराभवावर संताप व्यक्त केला होता.
अयोध्येतील राम मंदिर असलेल्या मतदारसंघात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने विजयाचा गुलाल उधळला आहे. फैजाबाद मतदारसंघातून भाजपकडून लल्लू सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच समाजवादी पक्षाकडून अवदेश प्रसाद हे रिंगणात होते. पण या लढतीमध्ये समाजवादी पक्षाच्या अवदेश प्रसाद यांचा विजय झाला.
अयोध्येतील भाजपच्या पराभवावर मुकेश खन्ना यांची प्रतिक्रिया
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना मुकेश खन्ना यांनी म्हटलं की, 'अयोध्या निवडणुकीतील पराभवातून हे शिकले पाहिजे की भव्य मंदिरासोबतच आसपासच्या लोकांचेही जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोटींच्या बजेटमध्ये तेथील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काही कोटी ठेवणे आवश्यक आहे. राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूर जवळील शाम मंदिर असो, भक्तीस्थळाला पर्यटन स्थळ होऊ देऊ नका. लोकही तिथे राहतात, त्यांचीही काळजी घेणं गरजेचं आहे.
View this post on Instagram
मुकेश खन्ना यांच्या पोस्टवर नेटकरी बरसले
ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकरी मुकेश खन्ना यांच्यावर चांगलेच बरसले. एका युजरने लिहिलं की, 'तुम्ही गप्प बसा, तुमच्या एसी रूम आणि स्टुडिओमध्ये बसून ज्ञान देऊ नका, तुमच्यासारख्या लोकांना ज्ञान देण्याचा अधिकार नाही, तुम्हाला राम मंदिराचे आमंत्रण मिळाले आणि तुम्ही गेला नाही, नंतर ते म्हणाले की अरुण गोविल यांच्या दर्शनाची योग्य व्यवस्था आयोजकांना करता आली नाही, माझ्यासोबतही हे घडले, म्हणूनच मी गेलो नाही, तुम्हाला राम मंदिरात व्हीआयपी ट्रीटमेंट हवी आहे. तर एका युजरने म्हटलं की, 'तुम्ही एकदा अयोध्येत जा आणि तिथे किती विकास झाला आहे ते पहा, मग काहीतरी बोला.'