Bigg Boss Marathi: पुन्हा बिग बॉस आदेश देणार, मेघा, पुष्कर, स्मिता, सई पुन्हा घरात!
टीव्हीवर बिग बॉस मराठीचा प्रोमो आला आणि पुन्हा एकदा आता तिसरा सीझन येणार की काय याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : लॉकडाऊन काळानंतर टीव्ही मालिका पुन्हा नव्याने सुरू झाल्या. सर्वच मराठी वाहिन्यांनी आपली कंबर कसली. काही चॅनल्सवर नव्या मालिका अवतरल्या, तर काही चॅनल्सवर जुन्या मालिका नव्याने सुरू झाल्या.
याचा थेट परिणाम टीआरपीवरही झाला. आता जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी चॅनल्स रात्रीचा दिवस करतायत. अशातच टीव्हीवर बिग बॉस मराठीचा प्रोमो आला आणि पुन्हा एकदा आता तिसरा सीझन येणार की काय याकडे लोकांचं लक्ष लागलं. टीव्हीवर बिग बॉसचा प्रोमो आल्यामुळे एकीकडे संभ्रम निर्माण झाला असताना, दुसरीकडे या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये सीझन 3 असं नमूद नसल्यामुळेही हा नक्की काय प्रकार आहे याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलं होतं.
एबीपी माझाच्या हाती मात्र यातली गोम लागली आहे. वाहिनीवर बिग बॉस पुन्हा सुरू होणार आहे हे खरं आहे. यातही बिग बॉसचं घर असणार आहे. त्याच त्या कुरघोड्या असणार आहेत. गेम असणार आहेत.. जुळलेली नाती असणार आहेत. पण हा बिग बॉस नवा नसेल. म्हणजे, हा गेम शे जुनाच नव्याने लावण्यात येणार आहे. बिग बॉसचा पहिला सीझन आता पुन्हा दाखवण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात बिग बॉसचा दुसरा सीझन ज्यात शिव ठाकरे विजेता ठरला होता तो दाखवण्यात आला होता. पण आता बिग बॉसचा पहिला सीझन ज्याची विजेती होती मेघा धाडे तो सीझन पुन्हा दाखवण्यात येणार आहे.
येत्या आठवड्याापसून हा शो नव्याने दाखवण्यात येणार आहे. त्या शोला कसा प्रतिसाद मिळतोय ते पुढच्या काही आठवड्यात कळेलच.