'ही' मराठी अभिनेत्री झळकणार इम्रान हाश्मीसोबत, Netflix च्या नवीन सिरीजने चाहत्यांची उत्सुकता ताणली
या व्हिडिओत तिचा लूक आणि बॉडी लँग्वेज प्रचंड प्रभावी दिसत असून, ती एका वेगळ्याच अवतारात दिसणार असल्याचं स्पष्ट होतंय.

Amruta Khanvilkar: वर्ष 2025 संपत असताना अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या चाहत्यांसाठी एकामागोमाग एक सरप्राईज घेऊन येत आहे. चित्रपट, वेब सीरिज आणि डान्स रिअॅलिटी शोमधून सतत चर्चेत असलेली अमृता आता आणखी एका दमदार प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या नव्या कोऱ्या वेब सीरिज ‘तस्करी’ मध्ये अमृता प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अमृता -इम्रान हाश्मीची जोडी पहिल्यांदाच
विशेष बाब म्हणजे या वेब सीरिजमधून अमृता खानविलकर आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी यांची जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘तस्करी’ या सीरिजमध्ये इम्रान हाश्मीसोबत अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांचाही समावेश असल्याचं समजतं. त्यामुळे या सीरिजबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अमृताने नुकताच सोशल मीडियावर ‘तस्करी’चा टीझर शेअर केला असून, तिच्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे,” असं म्हणत अमृताने हा टीझर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिचा लूक आणि बॉडी लँग्वेज प्रचंड प्रभावी दिसत असून, ती एका वेगळ्याच अवतारात दिसणार असल्याचं स्पष्ट होतंय.
अमृतासाठी 2026ची सुरुवात खास ठरणार
‘तस्करी’मध्ये अमृता नेमकी कोणती भूमिका साकारणार, तिचा इम्रान हाश्मीसोबतचा ट्रॅक काय असणार, तसेच ही कथा कुठल्या प्रकारच्या तस्करीभोवती फिरणार आहे, याबाबत सध्या सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या वेब सीरिजच्या रिलीजची वाट पाहणं प्रेक्षकांसाठी अधिक रंजक ठरणार आहे. 2025 या वर्षात अमृताने विविध आणि नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयासोबतच तिचा आत्मविश्वास आणि प्रयोगशीलता नेहमीच कौतुकास्पद ठरली आहे. वर्ष संपताना देखील ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणार, यात शंका नाही. दरम्यान, नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे वेब सीरिजसोबतच नाटकाच्या माध्यमातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने तिचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. अमृता खानविलकरसाठी 2025 चा शेवट आणि 2026 ची सुरुवात दोन्ही खास ठरणार, असं सध्या तरी दिसून येत आहे.























