एक्स्प्लोर
मन फकिरा | मनातल्या खेळाचा उत्कट सोहळा
हा सिनेमा ताजा अनुभव देतो. मजा आणतो. मानवी नातेसंबंधांकडे पुन्हा एकदा फुंकर मारायला लावतो आणि सर्वात महत्वाचं व्हॉट इफ.. च्या काल्पनिक कात्रीतून सोडवणूक करतो.. हेच या सिनेमाचं यश आहे.
मन फकिरा..
सिनेमाचं नाव वेगळं.
ट्रेलर पाहिलात?
तर त्यात काय दिसतं? लग्नाच्या पहिल्या रात्री नव दाम्पत्य एकमेकाजवळ आल्यानंतर एका उत्कट क्षणी त्याच्या तोंडून त्याच्या लग्नाआधीच्या प्रेयसीचं नाव येतं. सगळा बावचा होतो. नवरी हिरमुसते.आयुष्यात प्रथमच येणाऱ्या एका अत्यंत 'मोक्याच्या' क्षणी आपला पती दुसऱ्याच एका स्त्रीचं नाव घेतो म्हणजे काय! मग पुढे? पुढे काय.. काही तासांनी दोघे भेटतात.. त्यावेळी तीसुद्धा आपल्या प्रियकराचं नाव आपल्या नववराला सांगते. म्हणजे दोघांना कळून चुकतं, की आपलं लग्न जरी एकमेकांशी लागलं असलं तरी आपल्या दोघांच्याही मनात दुसरीच दोन माणसं घर करून आहेत.
मग?
काय होईल अशावेळी?
उत्तम प्लॉट. उत्तम अशासाठी की अशा गोष्टींची आपल्याला सवय नाही. शिवाय लग्न झाल्यानंतर मनात असलेल्या प्रिय व्यक्तींची नावं एकमेकांना सांगणं.. त्यांना भेटणं हे आपल्या समाजात नैतिक मानलं जात नाही. भले पिढी बदलली.. विचार बदलले.. इंटरनेटचा जमाना आला तरी आपले संस्कार आपल्या मनात अत्यंत घट्ट रुतून असतात. त्यात गैरही काही नाही. कारण ते पिढ्यांपिढ्यातून आलेले असतात. मग ही जोडी नेमका काय निर्णय घेते.. तो घेतल्यानंतर त्याच्या त्यांच्या घरच्यांवर काय परिणाम होतो आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, या नवदाम्पत्याच्या मनात असलेल्या दुसऱ्याच दोघांना त्याबद्दल काय वाटतं.. याचा हा सिनेमा मन फकिरा. प्रेम आहे, बहुतेक.. वगैरे.
मानवी मनाचा थांग लागणं अवघड असतं. एखाद्याच्या मनात काय चाललंय.. त्याचा कोणता कोपरा कोणत्या भावनांनी व्यापला आहे हे ओळखणं कर्मकठीण. समाजाने ठरवलेल्या नैतिक-अनैतिक गोष्टींच्या कात्रीत सतत अडकत राहतं मन. समाजात राहताना, समाजाने घालून दिलेली बंधनं पाळताना कधीमधी मनालाही वाटतं आक्रमक व्हावं.. सगळ्या सीमारेषा पुसून जे वाटतं ते करावं. पण जे वाटतं ते करता येतंच असं नाही. आणि वाटतं तसं केलं तरी ते वाटणं तहहयात टिकेल याची शाश्वती नाही. म्हणूनच मनातले खेळ खेळले जातात मनातल्या मनात. हे खेळ आपले आपल्यापुरते असतानाच एका बेसावध क्षणी बाहेर आले तर मात्र त्या खेळाला सामाजिक बंधनं लागू होतात. नैतिकतेच्या तराजूत त्याची रवानगी होते. अशा मनातल्या खेळाला अलगद चिमटीत धरून लोकांसमोर पेश करण्यात आलं आहे या सिनेमातून.
मृण्मयी देशपांडेने यापूर्वी अभिनेत्री म्हणून स्वत: ला सिद्ध केलं आहेच. आता ती दिग्दर्शनात पदार्पण करते आहे. केवळ दिग्दर्शन नव्हे, तर या चित्रपटाचं लेखनही तिचं आहे. पहिला चित्रपट निवडताना वेगळा, काहीसा गुंतागुंतीचा विषय निवडणं हे धाडस आहे. पण तिने ते जमवलं आहे. असा काहीसा गुंतागुंतीचा विषय घेऊन तो तितकाच पटवून देणं हे सोपं काम नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे, तो विषय मांडताना कौटुंबात होणारे संस्कार, जबाबदाऱ्या याचंही भान राखण्यात आलं आहे. उत्तम कथा, नेटकी आणि नेमकी बांधलेली पटकथा, श्रवणीय-ताजं संगीत, त्याला छायांकनाने दिलेली उत्तम साथ यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो आणि मुद्दे पटवत पटवत रंजन करतो. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, आक्रमकता नाही. चार महत्वाच्या व्यक्तिरेखा आपआपली जगण्याची तत्व घेऊन जगत राहतात. एकमेकांआड येतात.. कधी एकमेकांना क्रॉस होतात. कधी समांतर चालत राहतात. ही त्यातली मजा आहे. दिग्दर्शिकेने त्यातल्या संवादांमध्ये रूमीचे काही कोटही वापरले आहेत. संपूर्ण अवकाश तुमच्यात असतं अशा आशयाचा माहीचा संवाद तिचं जगणं दाखवतो. माहीशी बोलताना 'भारतात मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांना हुशार असावं लागतं' हे वाक्यही क्षणार्धात मध्यमवर्गीय मानसिकता, या मुलांना भारतात असलेली असुरक्षितता अधोरेखित करतं. सतत बॅकअप प्लान तयार ठेवून पुढं जाणारा नचिकेत दिसतो. रिया आणि भूषण यांचीही आपली जगण्याची रीत आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना मजा आहे. शिवाय यांच्या जोड्या लावतानाही रियाला आवडलेला नचिकेत तिच्यापेक्षा आक्रमक आहे. तर भूषण जिच्या प्रेमात आहे ती माही तितकीच स्वच्छंदी, मनस्वी जगणारी आहे.
भूषण-रिया रंगवणारे सुव्रत जोशी आणि सायली संजीव यांच्या व्यक्तिरेखांना तुलनेने जास्त कंगोरे आहेत. माही आणि नचिकेत रंगवणारे अंजली पाटील-अंकित मोहन हेही आपली छाप सोडून जातात. यांच्याखेरीज लक्षात राहते ती आई (रेणुका दफ्तरदार), बाबा (किरण यज्ञोपवित) आदी व्यक्तिरेखा. सुव्रत-सायलीने या सिनेमात जान आणली आहे. दोघांचं एकमेकांबद्दल असलेलं कुतूहल.. त्यानंतर आलेलं अवघडलेपण.. आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर नात्यांचा झालेला साक्षात्कार चोख दाखवला आहे. अंजली पाटीलची एंट्री आणि तिचा वावर अत्यंत आश्वासक आहे. अंकित दिसतो देखणा. पण काही प्रसंगांमध्ये त्यानं आणखी एक्स्प्रेसिव्ह असायला हवं असं वाटत राहतं. शिवाय सुरूवातीला भूषणला थेट प्रश्न विचारणारी रियाने नचिकेतलाही प्रश्न विचारायला हवे होते असं वाटून जातं. त्याचा अचानक आलेला इ मेल.. त्याचं जस्टिफिकेशन संवादातून येतं. पण नंतरची त्याची वर्तणूक ही बॅकअप प्लॅन पुरती राहते. भूषण आणि माहीच्या नात्यांचा आलेख जसा स्पष्ट होतो तसा वा तितकाच तो रिया-नचिकेतचा हवा होता असं वाटून जातं.
या सिनेमातून अंतिम परिणाम नक्कीच साधला जातो. आपल्या पहिल्याच चित्रपटातून मृण्मयीने दिग्दर्शकीय चुणूक दाखवली आहे. तिचं दिग्दर्शन कौतुकास्पद आहे. तरूणाईला आवडेल.. त्यांना समजेल अशा पद्धतीने वापरेली भाषा.. रंगभूषेचा अनावश्यक टाळलेला वापर यामुळे सिनेमा जगण्याजवळ जातो. म्हणूनच पिक्चर-बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळतायत साडेतीन स्टार्स. हा सिनेमा ताजा अनुभव देतो. मजा आणतो. मानवी नातेसंबंधांकडे पुन्हा एकदा फुंकर मारायला लावतो आणि सर्वात महत्वाचं व्हॉट इफ.. च्या काल्पनिक कात्रीतून सोडवणूक करतो.. हेच या सिनेमाचं यश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement