Kranti Redkar: परिस्थिती हाताबाहेर गेली, पण आता ..; क्रांती रेडकरनं शेअर केले छबिल- गोदोचे चेहेरे , नंतर म्हणाली..
आता क्रांती रेडकरने स्वतःच एक व्हिडिओ शेअर करत आपल्या दोन्ही मुलींचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.

Kranti Redkar: लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) आपल्या मुलींचे अनेक किस्से सोशल मीडियावर टाकताना दिसते. छबिल आणि गोदो या तिच्या दोन्ही जुळ्या मुलींच्या वेगवेगळ्या गोष्टींवरच्या प्रतिक्रिया काय असतात? त्या कशा वागतात हे क्रांती कायम व्हिडिओमध्ये सांगताना दिसते. क्रांती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स, मुलींचे खास क्षण ती शेअर करते. क्रांतीने बऱ्याच वेळा मुलींचे चेहरे न दाखवता त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे क्रांतीच्या या जुळ्या मुली कशा दिसतात? हे पाहण्याची इच्छा अनेक दिवसांपासून चाहत्यांना होती. आता क्रांती रेडकरने स्वतःच एक व्हिडिओ शेअर करत आपल्या दोन्ही मुलींचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी एका लग्नात छबील आणि गोदो यांचे चेहरे माध्यमांसमोर आल्याने क्रांतीला अपरिहार्यपणे आपल्या मुलींना समोर आणावं लागल्याचे दिसतंय. पण आपल्या मुलींनी कुठल्याही भीतीत मोठं होऊ नये हा विचार करून तिने आपल्या दोन्ही मुलींचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिलीय.
नेमकं काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओत गोदो आणि छबील एकमेकींना म्हणतात, आईने आपल्या चेहऱ्या लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण आता आपले चेहरे रिव्हिल झाले आहेत. आधी दोघीही आपण खूप दुःखी असल्याचं म्हणतात पण आपले चेहरे समोर आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय.
View this post on Instagram
या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत दोन्ही मुलींचे कौतुक केले आहे. अनेकांनी दोन्ही मुली क्रांती सारख्या दिसत असल्याचं म्हटलंय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये छबिल आणि गोदो आईच्या रीलमध्ये दिसणार का? असंही विचारलंय.
परिस्थिती हाताबाहेर गेली .. पण आता ..
क्रांती रेडकरच्या मुलींची नावं जीया आणि जायदा अशी आहेत. पण ती त्यांना प्रेमाने छबील व गोदो असे म्हणते. आपल्या मुलींचा या मजेशीर व्हिडिओवर क्रांतीने हा व्हिडिओ टाकण्यामागे नेमकं काय झालं अशी एक प्रतिक्रिया दिली आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते, "काही दिवसांपूर्वी एका लग्न सोहळ्यात छबिल व गोदो यांचे चेहरे रिव्हील झाले. खूप सार्या मीडिया पेजेसने त्यांचे व्हिडिओ पोस्ट केले. परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेली आणि आम्ही ते नियंत्रित करू शकलो नाही. आता त्यांचे चेहरे लपवून काहीच फायदा नाही याची जाणीव मला झाली आहे. खरंतर ते हास्यास्पद वाटेल. त्यांच्या सामान्यपणे जगण्याच्या इच्छांना आम्ही दाबून ठेवू इच्छित नाही. भीती असली तरी त्यांनी सतत भीतीत मोठं व्हावं असा आम्हाला वाटत नाही. उलट त्यांनी कणखर व्हावं सतत कोणाच्या आश्रयात असू नये असा आम्हाला वाटतंय. त्यामुळे आत्तापासून हे सगळं सोपं करतेय. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांच्याशी प्रेमाने वागा एवढीच तुम्हा सर्वांना विनंती." असं क्रांतीने लिहिलं आहे.























