बिग बॉसमध्ये जान सानूकडून मराठी भाषेचा अवमान, कलर्स वाहिनीनं मागितली माफी
बिग बॉसमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला होता. अखेर कलर्स टीव्हीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.
मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केल्यानंतर अखेर कलर्स टीव्हीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना आणि मनसेने दिला होता.
यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे. पत्रात म्हटलं आहे की, कालच्या भागात मराठी भाषेविषयी जो वादग्रस्त भाग प्रसारित झाला तो आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकत आहोत. महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत वाहिनीने पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील प्रेक्षक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो, असं पत्रात म्हटलं आहे.
'जान कुमार सानूला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो बंद पाडू', शिवसेनेचा इशारा
जान कुमार सानूची हकालपट्टी करा- शिवसेना
शिवसेना आमदार आमदार प्रताप सरनाईकांनी कलर्स वाहिनीला अल्टिमेटम दिलं आहे. जान कुमार सानूनं मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल असा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडाओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे.
त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. सलमान खानने स्पर्धकांना योग्य ती समज द्यावी, असं आवाहन देखील आमदार प्रताप सरनाईकांनी केलं आहे.
बिग बॉसची शूटिंग बंद पाडू - अमेय खोपकर
कलर्स चॅनेल आणि जान सानूने 24 तासाच्या आत जर शो मध्ये माफी मागितली नाही तर बिग बॉसची शूटिंग बंद पाडू असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे. जान सानूचं थोबाड फोडून आम्ही त्याला धडा निश्चित शिकवू आणि याला भविष्यात इंडस्ट्रीत काम कसं मिळतं हे ही पाहू, असंही खोपकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
'तुला थोबडवणार'... जान कुमारला मनसेचा इशारा
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणतात की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं देखील खोपकर यांनी म्हटलं आहे.
मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
जान सानूवर नेपोटिझमचा आरोप बिग बॉस 14 मध्ये सतत काही ना काही गोंधळ सुरु असतो. बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा बिग बॉसच्या घरात देखील जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रीयन गायक राहुल वैद्यने एलिमिनेशनमध्ये जान कुमार सानू नॉमिनेट करताना नेपोटिझमचा आरोप केला होता. जान कुमार सानूवर नेपोटिझमचा आरोप केल्यानंतर त्याच्या आईने आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, जानमध्ये प्रतिभा आहे. घरातील लोक तसेच पब्लिक देखील जानला त्याच्या टॅलेंटमुळं प्रेम करत आहेत, असं जानच्या आईनं म्हटलं आहे.