थिएटर, मल्टिप्लेक्स सुरु करण्याची परवानगी द्या, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेऊ; मल्टिप्लेक्स मालकांचा दावा
कोरोना महामारीमुळे चित्रपट क्षेत्राला तब्बल 1500 कोटींच्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. याचा मल्टिप्लेक्स पेक्षा सिंगल स्क्रिनच्या मालकांना मोठा फटका बसला आहे.
मुंबई : कोरोनामुळे देशांतील सर्व चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स बंद आहेत. बॉलिवूडचे सर्व मोठे चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत, ज्यामुळे देशातील बड्या थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी मल्टिप्लेक्स आणि सिनेमे आता सरकारला त्यांना खेळण्याची परवानगी देण्यास सांगत आहेत. सिनेमाला येणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वातावरण दिले जाईल आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व व्यवस्था केली जाईल, असा दावा मल्टिप्लेक्स मालक करीत आहेत. म्हणून या वेळी जेव्हा सिनेमा, मल्टीप्लेक्स उघडेल तेव्हा आपण काय बदल पहाल आणि कोरोना साठी कोणती सुरक्षा व्यवस्था केली जाईल.
1) टचलेस तिकिट काऊंटर
2) संपूर्ण चित्रपटगृहात हँड सॅनिटायझर, सॅनिटायझर मशीन
3) प्रत्येकाचे तापमान चेक करण्यासाठी तापमान मशीन
4) प्रत्येकाकडे आरोग्य सेतू अॅप अनिवार्य
5) कॅशलेस आणि टचलेस पेमेंट
6) सोशल डिस्टनसिंगसाठी दोन मीटर अंतरावर फूट मार्क
7) एक खुर्ची सोडून बसण्याची व्यवस्था
8) टचलेस टॉयलेट
9) रो वाईज एग्जिट
कार्निवल सिनेमाचे वीपी, कुनाल स्वाहनी यांनी एबीपी माझाला माहिती दिली की, 'कार्निवल सिनेमाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता थेटरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं आहे. चित्रपटगृहात काम करणारे कर्मचारी देखील पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेऊन काम करणार आहेत. ग्राहकांना देण्यात येणारे खाद्यपदार्थ अल्ट्रावायलेट किरणाच्या मदतीने पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून देण्यात येणार आहेत. शिवाय मल्टीप्लेक्समधील एसी सिस्टिममध्ये देखील बदल करण्यात येतोय. ज्यामुळे चित्रपटगृहात ताजी हवा येऊ शकेल'.
सध्या अनेक सिनेमे ओटीटी प्लाटफॉर्मवर प्रसिध्द होतायत. त्यामुळे सिंगल स्क्रिन, मल्टिप्लेक्सवाल्यांचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. जोपर्यंत व्यवसाय सुरु होणार नाही तोपर्यंत या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारों कुटुंबांची उपासमार होणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेत सरकारने आमच्या व्यवसायाला सुरु करण्याची परवानगी द्यावी असं व्यवसायिकांचं म्हणणं आहे. यासाठी आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्याचा दावा व्यवसायिकांनी केलाय.
5 जुनला मिशन बिगेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या व्यवसायांना कडक नियमांचं पालन करून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली. यामध्ये बाजारपेठा, अंतरदेशीय विमानसेवा, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे. आता चित्रपटगृहांच्या मालकांनी देखील व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मागितली आहे.
या सर्व बाबींचा विचार करता आता मल्टिप्लेक्सच्या मालकांना आशा आहे की, 15 ऑगस्टपासून चित्रपटगृह सुरु करण्यास परवानगी मिळेल.
कोरोना महामारीमुळे चित्रपट क्षेत्राला तब्बल 1500 कोटींच्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. याचा मल्टिप्लेक्स पेक्षा सिंगल स्क्रिनच्या मालकांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे आता चित्रपटगृहांचे मालक अपेक्षा व्यक्त करतायत की, लवकरच 90 एम एमचा पडदा खुलेल आणि सर्वसामान्यांना चित्रपटांचा आनंद घेता येईल.