Happy Birthday Anushka Sharma : 'माझी पत्नी...', विराटनं पहिल्यांदाच अनुष्काची अशी ओळख करुन दिली तेव्हा...
काल परवापर्यंत मी एक लहान मुलगा होतो आणि आता थेट माझी पत्नी... असं म्हणताना विराटच्या चेहऱ्यावरील आणि त्याच्या मनातील भाव खूप काही सांगून जातात.

Happy Birthday Anushka Sharma अभिनेत्री, चित्रपट निर्माती, मॉडेल, पत्नी, आई आणि एक खास मैत्रीण अशा अनेक रुपांमध्ये अनुष्का शर्मा हिनं प्रत्येक वेळी आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. चित्रपट विश्वातील कारकिर्दीसोबतत अनुष्कानं तिच्या खासगी जीवनालाही कायम प्राधान्यस्थानी ठेवलं. अशा या अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर तिची अनेक छायाचित्र आणि तिच्या जीवनातील काही खास क्षण सर्वांचंच लक्ष वेधत आहेत.
अनुष्काच्या जीवनातील याच खास क्षणांपैकी एक म्हणजे तिचा विवाहसोहळा. भारतीय क्रिकेट संघात आपली वेगळी अशी ओळख प्रस्थापित करत जागतिक स्तरावरही नावाजलेल्या विराट कोहली याच्याशी अनुष्कानं सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली.
इटलीमध्ये अतिशय खासगी सोहळ्यात या दोघांनीही एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. या सोहळ्यातील अनेक छायाचित्र आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. ज्यानंतर समोर आली विरुष्काच्या 'वेडिंग फिल्म'ची एक झलक.
In pics : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून टीपलेला महाराष्ट्र
माय वाईफ... माझी पत्नी... असं म्हणत विराटनं अनुष्काचा पहिल्यांदाच उल्लेख केला तेव्हाचा क्षण या व्हिडीओमध्ये आपल्याही मनाचा ठाव घेतो. काल परवापर्यंत मी एक लहान मुलगा होतो आणि आता थेट माझी पत्नी... असं म्हणताना विराटच्या चेहऱ्यावरील आणि त्याच्या मनातील भाव खूप काही सांगून जातात. जीवनात आपल्या जोडीदाराच्या येण्यानं होणारा आनंद, त्यातही ज्याच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीसोबत एका नव्या प्रवासाची सुरुवात करतानाचं कुतूहल, उत्सुकता आणि काहीसं दडपण विराट आणि अनुष्काला आलं असेल हे व्हिडीओ पाहताना लक्षात येतं.
पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विराटनं कायमच आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. तर, अनुष्कानंही त्याच्या पडत्या काळातही खंबीरपणे त्याची साथ दिल्याचं वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. म्हणूनच की काय, ही जोडी सर्वांच्याच पसंतीची आहे असं म्हणायला हरकत नाही.























