दीपिका पदुकोण अमली पदार्थ सेवनाची कबुली देणार?
ड्रग कनेक्शनमध्ये सगळ्यात मोठं नाव आलं आहे ते दीपिका पदुकोणचं. एनसीबीच्या समन्सनंतर ती शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहणार आहे. दीपिका अमली पदार्थ सेवनाची कबुली देणार?
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता पुरतं वाढलं आहे. या मृत्यूने बॉलिवूडमध्ये असलेलं ड्रग कनेक्शन उघड केलं आहे. अनेक मोठी नावं यात सापडू लागली आहेत. यात दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांची नावं समोर येत आहेत. पैकी रकुल प्रीत आज एनसीबीसमोर चौकशीला येणं अपेक्षित आहे. तर दीपिकाला शुक्रवार देण्यात आला आहे. तर श्रद्धा आणि सारा यांना शनिवार देण्यात आला आहे.
या ड्रग कनेक्शनमध्ये सगळ्यात मोठं नाव आलं आहे ते दीपिका पदुकोणचं. मिळालेल्या माहितीनुसार सध्या दीपिका गोव्यात शूट करत आहे. एनसीबीने बजावलेलं समन्स तिला मिळालं असून शुक्रवारच्या चौकशीसाठी ती गुरुवारी गोव्यातून निघणार आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता तिचं विमान गोव्यातून मुंबईला यायला निघेल. असं असताना मिळालेल्या माहितीनुसार दीपिका आपण अमली पदार्थ सेवन करतो हे कबूल करण्याच्या विचारात आहे. त्याबद्दल तिने आपल्या वकिलांशी बोलणं सुरु केलं आहे. पण तिच्या क्वान या टॅलेंट कंपनी मात्र तसं न करण्याचा आग्रह तिला करत असल्याचं वृत्त आहे. दीपिकाने तसं करु नये म्हणून वेगवेगळे दबाव तिच्यावर टाकले जाताना दिसत आहेत.
दीपिकाची उद्या चौकशी होणार आहे. एनसीबीने बजावलेलं समन्स तिला मिळालं आहे. दीपिकाला एनसीबीसमोर जे झालं ते कबूल करायचं आहे. पण तिने तसं करुन नये असं तिच्या टॅलेंट मॅनेजर कंपनीचं म्हणणं आहे. याबद्दल तिला बरंच सांगूनही दीपिका त्यांचं ऐकत नाही हे कळल्यावर क्वानची एक टीम गोव्याला रवाना झाली आहे. तिने तसं करु नये म्हणून तिच्यावर वेगवेगळे प्रेशर्स आणण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे क्वानही कंपनीही शंकेच्या फेऱ्यात आली आहे.
क्वान ही बॉलिवूडची मोठी टॅलेंट कंपनी आहे. त्यांच्याकडे जवळपास 40 कलाकार आहेत. या सगळ्यांचं ते टॅलेंट मॅनेज करतात. आता या कंपनीवर आणि ते मॅनेज करत असलेल्या सर्वच कलाकारांवर एनसीबीची नजर असणार का हे येत्या काळात कळेल. दीपिकाही एनसीबीसमोर काय सांगते त्यासाठी शुक्रवारची वाट पाहावी लागणार आहे.