Siddharth Jadhav : "जुगाराची जाहिरात मी कधीच करणार नाही"; सिद्धार्थ जाधवने स्पष्टच सांगितलं, मराठी, हिंदीनंतर 'आपला सिद्धू' झळकणार 'या' इंग्रजी चित्रपटात
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवचा 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' (The Defective Detectives) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परितोष पेंटर (Paritosh Painter) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
Siddharth Jadhav : मराठी आणि हिंदी सिनेंमात आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडल्यानंतर सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आता इंग्लिश चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज आहे. परितोष पेंटर (Paritosh Painter) यांच्या 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' (The Defective Detectives) या सिनेमाच्या माध्यमातून 'आपला सिद्धू' आता इंग्लिश सिनेमात झळकणार आहे. 5 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.
'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' या सिनेमाबद्दल एबीपी माझाशी बोलताना सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav on The Defective Detectives) म्हणाला,"द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' या सिनेमाचं श्रेय परितोष पेंटर (Paritosh Painter) सरांना जातं. परितोष पेंटर यांच्यासोबत मी याआधी 'लोच्या झाला रे' हा सिनेमा केला होता. परितोष पेंटर हे गुजराती आणि हिंदी इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. विनोदात त्यांचा वेगळा बाज आहे. 'अफलातून','थ्री चिअर्स' आणि 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' असे तीन वेगवेगळ्या भाषांतील सिनेमे त्यांनी बनवले आहेत. एक विनोद तीन वेगळ्या प्रकारे प्रेझेंट होतोय यात गंमत आहे. त्यामुळे या सिनेमासाठी मी खूप उत्सुक आहे".
View this post on Instagram
सिद्धार्थ म्हणाला,"आंधळा, बहिरा आणि मुका या तीन मित्रांभोवती फिरणारा 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज' हा सिनेमा आहे. इंग्लिश सिनेमासाठी काम करणं खूप कमाल अनुभव होता. सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. श्वेता गुलाटी, जॉनी लीव्हर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोनारी, परितोष पेंटर, जयेश ठक्कर हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पहिल्यांदाच इंग्लिश सिनेमात मी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे".
सिद्धार्थ जाधवसाठी 'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज'ची प्रोसेस कशी होती?
'द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हज'च्या प्रोसेसबद्दल बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला,"माझ्याआधी या सिनेमासाठी एका वेगळ्या अभिनेत्याला विचारणा झाली होती. पण काही कारणास्वत त्याला हा सिनेमा करता आला नाही. पुढे या सिनेमासाठी परितोष पेंटर सरांनी मला विचारलं. ज्याला बोलता येत नाही अशा मुका असणाऱ्या मानवची भूमिका मला देण्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं. पण आंधळा असणाऱ्या श्रीची भूमिका किती महत्त्वाची आहे हे त्यांनी मला सांगितलं. मानव आणि आदित्य अशा दोघांसोबत संवाद साधणारा श्री आहे. त्यामुळे ही भूमिका करताना मला खूप मजा आली. आता पडद्यावर पाहताना प्रेक्षकांनादेखील मजा येईल. 5 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा देशभर प्रदर्शित होत आहे. कोलकाता, दिल्ली, बंगळूरु, गुजरात या खूप चांगल्या चांगल्या शहरात हा सिनेमा रिलीज होत आहे".
इंग्लिश सिनेमासाठी सिद्धार्थने काय विशेष मेहनत घेतली?
सिद्धार्थ म्हणाला,"परितोष सरांना फॉलो करायचं काम मी केलं आहे. इंग्रजी भाषेतील शब्दांचं प्रोनाऊन्सेशन खूप कठीण आहे. त्यामुळे श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, परितोष सर, जॉनी भाई या सर्वांनी मला शिकवलं आहे. कोणत्या शब्दावर कसा भर द्यायचा हे कळलं. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने मला मदत केली आहे".
सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ तब्येत कसा सांभाळतो?
सिद्धार्थ जाधव फिटनेसकडे खूप लक्ष देतो. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"दारू, सिगारेट या गोष्टींकडे मी कधी आकर्षित झालो नाही. आयुष्यात मी या गोष्टींना हात लावणार नाही, असं मी माझ्या आईला वचन दिलं होतं. जर व्यसन करण्याची इच्छा झाली तर आमचा चेहरा डोळ्यासमोर आण, असं आई म्हणायची. आई-वडिलांना दिलेल्या शब्दाखातर मी कधी व्यसन करत नाही. तसेच मला माझा भाऊ नेहमीच सांगतो की स्वत:ला फिट ठेवलं पाहिजे. डाएट करत नसलो तरी व्यायामाकडे लक्ष देतो. स्वत:साठी थोडा वेळ काढायला लागलो आहे. मी शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड ॲम्बेसेडर होतो. हे मला खूप अभिमानास्पद वाटलं होतं".
सिद्धार्थ जाधव टाळतो जुगारासंबंधित जाहिराती
सिद्धार्थ जाधव व्यसन न करण्यासोबत जुगारासंबंधित जाहिराती करणंदेखील टाळतो. याबद्दल बोलताना तो म्हणाला,"सोशल मीडियावर जुगारासंबंधित जाहिराती करण्यासंबंधित विचारणा होते. पण या जाहिराती करण्याचं मी टाळतो. या जाहिरातींचे उत्तम पैसे मिळत असले तरी त्या करण्याची माझी कधीच इच्छा होत नाही. जुगारासंबंधित कोणतंही अॅप प्रमोट करणंही मी टाळतो आणि यापुढेही करणार नाही".
संबंधित बातम्या