एक्स्प्लोर
विजूमामावरुन वाद, सचिन कुंडलकरांच्या पोस्टची जितेंद्र जोशीकडून चिरफाड
सिनेसृष्टीतील सर्व कलाकार तुमचे मामा-मावशी कसे असतात? असा सवाल सचिन कुंडलकर यांनी उपस्थित केला. त्याला जितेंद्र जोशीने उत्तर दिलं.
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर, दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे, सिनेसृष्टीत वाद उफाळला आहे. सचिन कुंडलकर यांना अभिनेता जितेंद्र जोशीने सडेतोड उत्तर दिलं. विजय चव्हाण हे विजूमामा म्हणून परिचीत होते. मात्र सिनेसृष्टीतील सर्व कलाकार तुमचे मामा-मावशी कसे असतात? असा सवाल सचिन कुंडलकर यांनी उपस्थित केला. त्याला जितेंद्र जोशीने उत्तर दिलं.
अभिनेते विजय चव्हाण गेले आणि अवघी इंडस्ट्री हळहळली. प्रत्येकाने शोक व्यक्त केला. या व्यक्त करण्यात हळहळ होती. प्रत्येकाने चव्हाण यांना वेगवेगळी विशेषणं वापरली. कुणी त्यांना विजू मामा म्हणालं.. कुणी मावशी म्हणालं.. कुणी म्हणालं मावशी पोरकी झाली.. कुणी लिहिता झालं.. की विजूमामा गेल्याने इंडस्ट्री पोरकी झाली. पण यात सगळ्यात हळहळ होती. शोक होता. कुणी विजय चव्हाण यांचे फोटो पोस्ट करत होतं. मोरूची मावशीमधले फोटो, टांग टिंग टिंगाचं गाणं असं बरंच काही होतं फेसबुकच्या वाॅलवर. पण हे होणार होतंच. कारण प्रत्येकजण व्यक्त होत होता. याला वेगळं वळण लागलं ते दिग्दर्शक, लेखक सचिन कुंडलकर यांच्या पोस्टमुळे.
सचिन कुंडलकर हे दिग्दर्शक म्हणून प्रख्यात आहेतच. यापूर्वी त्यांनी गंध, हॅप्पी जर्नी, गुलाबजाम असे सिनेमे केले आहेत. शिवाय, नुकत्याच आलेल्या न्यूड या चित्रपटाचं लेखनही त्यांनी केलं आहे. यांनी आपली एक फेसबुक पोस्ट टाकली आणि नवा वाद सुरू झाला. आपल्याकडे सगळे एकमेकांनी मामा, मावशी का म्हणतात, असं विचारून इंडस्ट्री पोरकी वगैरे म्हणण्याला फार अर्थ नसल्याचा दावा केला. त्याचसोबत शोक व्यक्त करण्याच्या पद्धतीबद्दलही अनेक प्रश्न विचारले. तिरसक शैलीत लिहिलेली ही फेसबुक पोस्ट बरीच व्हायरल झाली. यात उमेश कामत, स्पृहा जोशी, सई ताम्हणकर यांची नावं ही आहेत. आपल्या इंडस्ट्रीत संबोधण्याची पद्धत पाहता काही दिवसांनी उमेश मामा, स्पृहा मावशी असे लोक म्हणू लागतील असंही त्यांनी यात म्हटलं आहे. त्यांची फेसबुक पोस्ट अशी.
काय आहे नेमका वाद?
सचिन कुंडलकर यांनी दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी फेसबुक पोस्ट केली.
'मराठी रंगभूमीवरील सर्व कलाकार तुमचे मामा आणि मावशी कसे असू शकतात? आणि प्रत्येक आठवड्यात कोणीतरी मामा-मावशीच्या निधनाने रंगभूमी कशी पोरकी होते?. जेव्हा मामा आजारी होते तेव्हा कोणी त्यांना भेटायला गेलं होतं का? जेव्हा रंगभूमीवरील सध्याच्या मामा आणि मावशींचं निधन होईल तेव्हा उमेश कामत मामा असेल तर स्पृहा आत्या असेल? सई तुमची मावशी असेल? आणि त्यानंतर अमेय वाघ मामा आणि पर्ण पेठे मावशी? रंगभूमी पोरकी झाली हे खूपच रटाळ वाक्य आहे.' अशी उपरोधिक टीका सचिन कुंडलकर यांनी केली.
अनेकांच्या कमेंट्स
या पोस्टवर लगेच कमेटं आल्या. यात इतर वाचक व्यक्त झालेच. शिवाय, शुभांगी गोखले, चिन्मयी सुमित, विद्याधर जोशी असे बरेच कलाकारही व्यक्त झाले. काहींनी त्याची तारीफ केली तर काहींनी व्यक्त होण्याची ही वेळ नसल्याचेही सुनावलं. कालपर्यंत हा मामला आतल्या आत धगधगत होता. मात्र आज अभिनेता जीतेंद्र जोशी याने मात्र सचिनच्या पोस्टचा खरपूस समाचार घेतला. मामा मावशी म्हणण्यात गैर काय असं विचारून सचिन आपणही सुमित्रा भावे यांना सुमित्रा मावशी म्हणताच की असं सुनावलं. त्यानंतर मात्र प्रत्येकजण व्यक्त होऊ लागला.
जितेंद्र जोशीचं उत्तर
सचिन कुंडलकरांच्या या पोस्टनंतर अनेक चांगल्या-वाईट प्रतिक्रिया येत आहेत. कुणी सचिन कुंडलकरांच्या रोखठोक बोलण्याचं कौतुक केलं, तर अनेकांनी वेळ चुकल्याची प्रतिक्रिया दिली.
अभिनेता जितेंद्र जोशीने मात्र सचिन कुंडलकरांच्या पोस्टवर कमेंट न करता, थेट स्वत:च्या वॉलवरुन कुंडलकरांच्या पोस्टची चीरफाड केली.
“विजय चव्हाण यांना आम्ही "मामा" म्हटलेलं तुम्हाला चालत नाही परंतु सुमित्रा भावेंना तुम्ही एकेरी नावाने हाक न मारता "मावशी" म्हणता आणि महेश एलकुंचवारांचा उल्लेख महेश"दा" असा करता . बरं कसंय ना कि हे आम्हाला लहानपणापासून शिकवलंय आमच्या घरच्यांनी ज्याला आम्ही संस्कार असं म्हणतो त्यानुसार आमच्या घरी कामाला येणाऱ्या बाईला सुद्धा मावशी आणि रिक्शा टॅक्सी वाल्या वयस्कर गृहस्थाला अत्यंत सहजतेने काका/मामा म्हणतो आणि हे कुणीतरी बळजबरी केली म्हणून नव्हे तर तसा भाव आमच्या मनात प्रकट होतो आपोआप” असं जितेंद्र जोशीने म्हटलं आहे.
जितेंद्र जोशीची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
जितेंद्रच्या पोस्टवर कमेंट्स
जीतेंद्रची ही पोस्ट वाचल्यानंतर अर्चना नेवरेकर, मिलिंद शिंत्रे, गौतमी पुरूषोत्तम बेर्डे अशी बरीच मंडळी बोलू लागली आहेत. अनेकांनी सचिनच्या या पोस्टचं खंडन करत नाराजी दर्शवली आहे. मामा, दादा, मावशी, ताई म्हणणं ही आपल्या मराठी लोकांची पद्धत आहे. असं सांगतानाच, विजय चव्हाण हे विजूमामा म्हणून, अशोक सराफ हे अशोकमामा या नावाने, संगीतकार अशोक पत्की हे पत्की काका म्हणून आणि पुरूषोत्तम बेर्डे हे पुरुदादा म्हणून प्रचलित असल्याचं म्हटलं आहे.
विजय चव्हाण यांच्या निधनाच्या धक्क्यात असताना सचिन यांनी टाकलेल्या या पोस्टमुळे इंडस्ट्रीसह सामान्य माणूस पुरता दुखावला गेला हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement