Adipurush: ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या 'गुडबाय किस' प्रकरणावर रामायण फेम अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...
ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या 'गुडबाय किस' प्रकरणावर रामायण मालिकेत सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (dipika chikhlia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Adipurush: दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुष चित्रपटामधील अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि ओम राऊत (Om Raut) यांच्या एका व्हायरल व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. काही दिवसांपूर्वी भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात क्रिती सेनन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत हे दर्शनासाठी गेले होते. या मंदिराच्या आवारातील क्रिती आणि ओम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिरातून बाहेर आल्यावर एकमेकांना निरोप देताना ओम राऊत आणि क्रिती यांनी मिठी मारली आणि ओमने क्रितीला गालावर गुडबाय किस केलं. या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी क्रिती आणि ओम यांना ट्रोल केलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर रामायण मालिकेत सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (dipika chikhlia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या दीपिका चिखलिया?
ओम राऊत आणि क्रिती यांच्या गुडबाय किस प्रकरणावर दीपिका चिखलिया यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले. याबाबत त्या म्हणाल्या, "मला वाटतं, आजच्या कलाकारांची ही एक मोठी समस्या आहे की ते त्या भूमिकेत उतरत नाहीत आणि त्या व्यक्तिरेखेच्या भावना समजून घेत नाहीत. क्रिती ही आजच्या पिढीमधील अभिनेत्री आहे. आजच्या पिढीमध्ये कोणाला किस करणे किंवा मिठी मारणे हे स्वीट जेस्चर मानला जातो. तिने स्वतःला कधीच सीताजी समजले नसेल. शेवटी हा भावनेचा विषय आहे, मी सीतेचे पात्र जगले आहे, तर आजकालच्या अभिनेत्री सीतेला फक्त भूमिका म्हणून साकारतात. चित्रपट किंवा प्रकल्प संपल्यानंतर त्यांना त्याची पर्वा नसते."
पुढे दीपिका म्हणाल्या, "आता आमच्याबद्दल बोलायचे झाले तर आमच्या सेटवर कोणालाच आमच्या नावाने आम्हाला हाक मारण्याची हिंमत नव्हती. जेव्हा आम्ही आमच्या भूमिकेत होतो तेव्हा सेटवरील अनेक लोक येऊन आम्हाला नमस्कार करायचे. तो काळ वेगळा होता. त्यावेळी लोक मला अभिनेत्री मानत नव्हते, देवच मानत होते. आम्ही कोणाला मिठीही मारू शकत नव्हतो, किस तर फार दूरची गोष्ट झाली आहे."
"आदिपुरुष चित्रपटाच्या रिलीजनंतर, सर्व कलाकार त्यांच्या इतर प्रोजोक्ट्समध्ये व्यस्त होतील आणि कदाचित ते भूमिका विसरतील, परंतु आमच्या बाबतीत असे कधीच घडले नाही. आम्ही लोकांच्या भावना दुखावणारे काही केले नाही." असंही दीपिका यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या: