Adipurush Controversy: 'पात्र जर श्रीलंकेचं असेल, तर ते मुघलांसारखं दिसता कामा नये!'; 'आदिपुरुष'च्या टीझरवर दीपिका चिखलिया यांची प्रतिक्रिया
रामायण या मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी 'आदिपुरुष' च्या टीझरवर प्रतिक्रिया दिली आहे.
Adipurush: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या (Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर रविवारी (2 ऑक्टोबर) रिलीज झाला. या टीझरनं अनेकांचं लक्ष वेधलं. सध्या 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात काही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी देखील काम केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन (Kriti Sanon) ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. या टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत. याबाबत आता रामायण या मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया (dipika chikhlia) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या दीपिका चिखलिया?
एका मुलाखतीमध्ये आदिपुरुषच्या टीझरबाबत दीपिका म्हणाल्या, 'चित्रपटातील पात्र प्रेक्षकांना आवडले पाहिजे. जर पात्र श्रीलंकेचे असेल तर ते मुघलांसारखे दिसू नये. टीझरमध्ये आम्ही त्याला फक्त 30 सेकंद पाहतो म्हणून मला जास्त समजू शकले नाही, परंतु तो वेगळा दिसतो. मी मान्य करतो की काळ बदलला आहे आणि VFX हा एक आवश्यक भाग आहे पण त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. हा फक्त टीझर आहे, यावरुन चित्रपट कसा असेल याचा अंदाज लावता येणार नाही.'
12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये 'आदिपुरुष' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आदिपुरुष हा पौराणिक शैलीतील चित्रपट आहे हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.याआधी ओम राऊतचा तान्हाजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता आदिपुरुष या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: