Nitin Desai Suicide: 'तो लढवय्या होता...'; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर सुबोध भावेनं व्यक्त केल्या भावना
अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Nitin Desai Suicide: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आयुष्य संपवलं आहे. अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'तो लढवय्या होता. अनेक संकटांमधून तो बाहेर पडला होता. ' अशा भावना सुबोधनं व्यक्त केल्या आहेत.
सुबोध भावेनं एबीपी माझाला सांगितलं, '13 वर्षांच्या आठवणी आहेत. तो इतकं टोकाचं पाऊल उचलेल असं कधीच वाटलं नाही. तो लढवय्या होता. अनेक संकटांमधून तो बाहेर पडला होता. गेल्या वर्षी त्याच्या स्टुडिओला आग लागली होती. त्यावेळी देखील त्याच्यामधून तो बाहेर पडला. छोट्या-मोठ्या संकटामुळे डगमगणारा नितीन कधीच नव्हता. त्याच्याकडे बघून आम्हाला काम करायचं बळ मिळायचं. अनेक उत्तम कलाकृतींचा तो भाग होता. पडद्यावर सुंदर चित्र घडवणारा आमचा मित्र, स्वत:च चित्र का बेरंग करुन गेला? हे कळत नाही. त्यानं स्वत:च्या अडचणी कधीच कोणाला सांगितल्या नाहीत. त्याचं काम चालूच होतं.'
बालगंधर्व चित्रपटाबाबत सुबोध भावे म्हणाले, 'बालगंधर्व हा चित्रपट नितीन देसाई नसला असता तर होऊच शकला नसता. बालगंधर्व यांच्यामध्ये जी प्रेक्षकांसाठी काहीतरी करायची इच्छा होती, तशीच इच्छा नितीनमध्ये होती. त्यानं त्या चित्रपटासाठी वेगानं काम केलं. मोठी स्वप्न बघायचं पॅशन नितीनमुळे अनेकांमध्ये आलं. आम्ही त्याच्या मुलीच्या लग्नाला देखील गेलो होतो. मला त्याच्या विषयी खूप आदर होता.'
अभिनेता जितेंद्र जोशीनं सांगितलं, 'तो खूप मोठा व्हिजनरी माणूस होता. मला कळत नाहीये नक्की काय बोलावं. कधीही भरुन न निघणारी ही हानी आहे. कला दिग्दर्शन काय असतं? हे त्यांच्या कामाकडे बघून कळतं.तो दमदार माणूस होता. त्यांना असं का वाटलं असेल? कशामुळे हे घडलं असेल? मला काय बोलावं समजत नाही. कितीतरी आठवणी डोळ्यासमोरुन जात आहेत.'
नितीन देसाई यांचे चित्रपट
2005 मध्ये नितीन देसाई यांनी एन.डी.स्टुडिओची स्थापना केली. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते.'1942 अ लव्ह स्टोरी', 'हम दिल दे चुके सनम', 'माचिस', 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Nitin Desai Suicide : नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टी हादरली; कलाकारांनी व्यक्त केला शोक