एक्स्प्लोर
Advertisement
गुलाबो सिताबो.. वन टाईम वॉच!
अमिताभ बच्चन यांची आगळी रंगभूषा. उत्तम वेशभूषा यामुळे या सिनेमातल्या त्यांच्या व्यक्तिरेखेकडे लक्ष आहेच. शिवाय, एकापेक्षा एक सिनेमे देणारा आयुषमानही आता बच्चन साहेबांसमोर असल्यामुळे तो काय नवी जादू करतो ते पाहणंही औत्सुक्याचं ठरणारं होतं. अखेर तो सिनेमा आला.
लॉकडाऊननंतर अखेर नवा सिनेमा आला. या नव्या सिनेमानं आपल्या येण्याची जागा बदलली आहे. पण मनोरंजन क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून नवं काही घडत नव्हतं. पण गुलाबो सिताबो या सिनेमाच्या येण्यानं काहीतरी नवं घडतं आहे. शुजित सरकार दिग्दर्शित या सिनेमानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याचा मान मिळवला आहे. अमिताभ बच्चन यांची आगळी रंगभूषा. उत्तम वेशभूषा यामुळे या सिनेमातल्या त्यांच्या व्यक्तिरेखेकडे लक्ष आहेच. शिवाय, एकापेक्षा एक सिनेमे देणारा आयुषमानही आता बच्चन साहेबांसमोर असल्यामुळे तो काय नवी जादू करतो ते पाहाणंही औत्सुक्याचं ठरणारं होतं. अखेर तो सिनेमा आला.
चित्रपटाची गोष्ट साधी सोपी आहे. लखनौमध्ये फातिमा महल ही 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी हवेली आहे. त्याची बेगम आहे फातिमा. फातिमा आता 95 च्या जवळ पोचली आहे. तर तिचा नवरा तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे. तोही आता 80 च्या आसपास पोचला आहे. त्याचं नाव आहे मिर्झा. या हवेलीत वर्षानुवर्षं भाडोत्री कुटुंबं राहतात. जवळपास 70 वर्षांपेक्षा जास्त काळ ही कुटुंबं फातिमा महलमध्ये राहात असल्याने तुलनेनं भाडं फारच कमी आहे. यातलाच एक भाडोत्री आहे बांके. अर्थात आयुषमान खुराना. बांकेचं कुटुंब मात्र वेगळं आहे. सर्वातं कमी भाडं आणि तेही द्यायला मिर्झाला लावावा लागणारा तगादा यामुळे आधीच मिर्झा बांकेवर नाराज आहे. दोघेही एकमेकांच्या खोड्या काढतायत. अशातच या हवेलीवर पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याची नजर जाते. आणि योगायोग असा की या भाडोत्री लोकांचा जाच जावा म्हणून मिर्झा यांचे वकील मित्र ही हवेली मिर्झाच्या नावावर करण्याची कल्पना मिर्झाच्या डोक्यात भरतात. हवेलीची मालकी असते फातिमाकडे. मग मिर्झा.. बांके.. मिर्झाला हवी असलेली फातिमा महलची मालकी आणि पुरातत्व खात्याची हालचाल याची गोष्ट या सिनेमात दिसते.
मन फकिरा | मनातल्या खेळाचा उत्कट सोहळा
अमिताभ बच्चन यांचा अभिनय हा या सिनेमाचा हुकमी एक्का आहे. त्यांचं दिसणं.. वावरणं आणि अर्थातच शब्धफेक कमाल ए तारीफ आहे. शिवाय आयुषमाननेही आपल्या बोबडेपणातून गंमत आणली आहे. याशिवाय विजय राज आणि इतर सर्वच व्यक्तिरेखा मजा आणतात. पण या गोष्टीच्या पटकथेमध्ये आणखी काही प्रसंग असायला हवे होते असं वाटून जातं. म्हणजे अगदी उदाहरणार्थ सांगायचं तर पुरातत्व विभागाचा अधिकारी शुक्ला आधी आयुषमानला लेबोरेटरीत नेतो. ती हवेली कशी जुनी आहे.. त्यावर कसं काम चालू आहे हे दाखवतो. त्यानंतर काही वेळानंतर शुक्ला मिर्झासाहेबांनाही तिथे घेऊन जातो. तेव्हा पुढची काही मिनिटं ही.. 'हं कळलं पुढे' या मोडवर जातात. असं अनेकदा होतं. त्यातले काही प्रसंग गमतीदार आहेतच. मिर्झाचं छोट्या छोट्या गोष्टी चोरणं.. हवेलीचा ताबा मिळावा म्हणून मिर्झाची धडपड ही गमतीदार आहे. अडचण अशी आहे की हा सिनेमा कोपरखळ्या मारत नाही. किंवा टचकन डोळ्यात पाणी येईल इथवरही जात नाही. खेचलेल्या प्रसंगामुळे सिनेमाचा वेग कमी होतो. अर्थात यात फातिमा महल हे वेगळं कॅरेक्टर आहे. ही हवेली आणि त्या निमित्ताने सिनेमाचं वापरलेलं टेक्श्चर छान झालं आहे. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो छायांकनाचा. पार्श्वसंगीत मजा आणतं. पण गाणी ठीक आहेत.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती अशी की औटीटीवर येणाऱ्या चित्रकृतींचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. तो कंटेंट कुठे दाखवला जाणार.. कोण पाहणार.. त्याचा हुक पॉइंट कुठे कसा असायला हवा याचा बराच अभ्यास करण्यात आलेला असतो. आता अशा व्यासपीठावर जेव्हा गुलाबो सिताबो येतो तेव्हा काय होतं हे आधी समजून घ्यायला हवं. खरंतर, हा सिनेमा थिएटरमध्ये अनुभवावा असा आहे. त्यानंतर त्याची गंमत कळेल. मोबाईलवर किंवा टॅबवर पाहताना त्याला मर्यादा येतात. किंवा सरळ हा सिनेमा मोठ्या टीव्हीवर पाहिला तर उत्तम. अमिताभ बच्चन यांचा वावर. चाल हा भाग आहेच. पण इंटरनेटवर सिनेमा आणायचा तर होल्ड टिकवून ठेवणारी मांडणी हवी. नाहीतर 10-10 सेकंदांनी सिनेमा पुढे ढकलावा लागतो. असो. पण हा सिनेमा परफॉर्मन्सचा आहे. एकदा बघायला हरकत नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत तीन स्टार्स.
Film & Television | नियमांच्या अधीन राहून चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला मुभा, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement