(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhuri Pawar : पत्र्याच्या झोपडीत बालपण गेलेल्या माधुरी पवारच्या स्वप्नातलं घर कसं आहे? जोडीदाराबद्दल म्हणाली,"गव्हाळ रंगाचा"
Madhuri Pawar : माधुरी पवारने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे.
Madhuri Pawar : मराठमोळी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारचा (Madhuri Pawar) मोठा चाहतावर्ग आहे. माधुरी आज घराघरांत पोहोचली असली तरी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने तिच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे.
माधुरी पवारचं बालपण साताऱ्यात गेलं आहे. साताऱ्यात ती लहानाची मोठी झालेली आहे. तिचे वडील बांधकाम करत असल्याने ती आजीजवळ राहत असे. आजीच्या पत्र्याच्या झोपडीत तिचं बालपण गेलं. या छोट्या घरात तिने शिक्षण पूर्ण करत आपली नृत्याची आणि अभिनयाची आवड जोपासली.
माधुरीला कसं घर हवं आहे?
माधुरी म्हणाली,"आता मी माझ्या आई-बाबांसाठी एक छोटं घर घेतलं आहे. पण माझं स्वप्नातलं घर वेगळं आहे. मला फार मोठं घर नको आहे. एक छोटं चार खोल्याचं घर घेण्याची माझी इच्छा आहे. यात स्वयंपाकघर, हॉल, आणि दोन खोल्या असाव्यात. आणि ते कौलारु घर असावं असं मला वाटतं. सर्व सुविधा असलेल्या साधं घर असं माझं स्वप्नातलं घर आहे".
माधुरीला जोडीदार कसा हवा आहे?
जोडीदार कसा हवा याबद्दल बोलताना माधुरी म्हणाली,"लग्नाबद्दल मी अजून काहीही विचार केलेला नाही. सध्या करिअरकडे लक्ष देण्याचा मी प्रयत्न करत आहे. पण उत्तम मराठी येत असेल असा जोडीदार मला हवा आहे. माझं मराठी भाषेवर आणि महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे. त्यामुळे होणाऱ्या जोडीदाराला महाराष्ट्राचा इतिहास माहिती असायला हवा".
माधुरी पुढे म्हणाली,"छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जोडीदाराला माहित असणे गजरेजे आहे. तसेच तो स्त्रियांचा आदर करणारा असावा. त्याच्या पालकांप्रमाणे माझ्याही पालकांचा त्याने आदर केला पाहिजे. तो श्रीमंत असावा असं नाही. पण थोडेफार पैसे कमावणारा असावा. साड्या आणि चपलांशिवाय मी फार पैसे खर्च करत नाही. गव्हाळ रंगाचा असावा आणि माझ्यापेक्षा थोडा उंच असावा. तसेच आयुष्यभर त्याने माझं ऐकलं पाहिजे".
माधुरी पवारबद्दल जाणून घ्या.. (Who Is Madhuri Pawar)
माधुरी पवारचा जन्म साताऱ्यातील एका सामान्य कुटुंबात झाला आहे. 'महाराष्ट्राची लोककला' या कार्यक्रमाच्या माध्यमातून माधुरीने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 'अप्सरा आली' या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. 'तुझ्यात जीव रंगला', 'देवमाणूस' अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'देवमाणूस' मालिकेत तिने साकारलेली चंदा ही भूमिका प्रचंड गाजली आहे.
संबंधित बातम्या