मी चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता : अमित साध
बॉलिवूड अभिनेता अमित साधने चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. "मी वयाच्या 16 ते 18 वर्षाचा असताना चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याची कारणं वेगवेगळी होती. आता मला वाटतं की त्यावेळी मी करत होतो ती माझी मोठी चूक होती," असं अमित साध म्हणाला.
मुंबई : कुणाच्या आयुष्यात कसा प्रसंग येईल हे सांगता येत नाही. त्या प्रसंगांना सामोरं जाताना कोण काय विचार करत असेल हेही कल्पनेच्या पलिकडचं आहे. अशीच एक गोष्ट काय पो छे, सरकार 3 आदी चित्रपटांत भूमिका वठवलेला अमित साधने सांगितली आहे. ती ऐकून भल्याभल्या लोकांचे डोळे पांढरे झाले आहेत. अमितने आपल्या आयुष्यात चारवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
सुशांत सिंह राजपूतचा पहिला चित्रपट काय पो छेमधला त्याचा मित्र म्हणून अमितकडे पाहिलं जातं. सुशांतचं प्रकरण झालं तेव्हा अमित हिमाचल प्रदेशमध्ये होता. आता तो पु्न्हा मुंबईत आला आहे. त्याच्याशी बोलताना त्याने सुशांतबद्दल वक्तव्य केली आहेतच, पण आपलेही काही किस्से त्याने शेअर केले. तो म्हणाला, "आयुष्य कुणाला काय शिकवेल याचा नेम नसतो. मी वयाच्या 16 ते 18 वर्षाचा असताना चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याची कारणं वेगवेगळी होती. पण मला जगावसं वाटत नव्हतं. मला वाटे आता सगळं संपलं आहे. मी जगून काहीच उपयोग नाही. मी जगलो तरी कशासाठी मी जगायला हवं तेही मला कळत नव्हतं. या दोन वर्षात विशिष्ट काळाने मला असं वाटायचं आणि मी आत्महत्येचा प्रय्तन करायचो. पण दरवेळी मला त्यात अपयश यायचं."
अमितला चौथ्यांदा अपयश आल्यानंतर मात्र तो भानावर आला. अमित म्हणतो, "चारवेळा आत्महत्येचा प्रयत्न करुनही जेव्हा त्याला यश आलं नाही. तेव्हा मात्र मी भानावर आलो. माझ्या लक्षात आलं की मी जगायला हवं कदाचित. आता मला जे वाटतं आहे तिथे जगणं संपत नाही. त्यानंतर मी त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यालाही कष्ट पडले. थोडीथोडकी नव्हे, तर यातून मला बाहेर पडायला तब्बल 20 वर्षं लागली. आणि आता मला वाटतं की त्यावेळी मी करत होतो ती माझी मोठी चूक होती."
अमित साधला सुशांतच्या मृत्यूचाही मोठा धक्का बसला आहे. तो म्हणतो, "सुशांतच्या जाण्याने आपण सगळेच हादरुन गेलो आहोत. सुशांतच्या मृत्यूने बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. आता त्याच्या नसण्याने फरक पडतो आहेच. सुशांतच्या घटनेनं ज्याला काही फरक पडत नाही तो मग माणूस नसावाच. यातून बोध घेऊन आपण सगळ्यांनी परिस्थितीशी दोन हात करायला हवेत. त्यातून पुढे चांगलं काहीतरी हाताशी येईल."