Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटावर अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे; 'ते लोक धन्य आहेत' म्हणत सेन्सॉर बोर्डालाही फटकारलं
'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाच्या निर्मात्यांना उच्च न्यायालयानं फटकारले आहे.
Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या निर्मात्यांना हायकोर्टाने फटकारले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकांवर सुनावणी करताना सांगितले की, 'चित्रपटात ज्याप्रकारे धार्मिक व्यक्तिरेखा साकारल्या गेल्या आहेत, त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील.'
'कायदा न्यायालय कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही. सर्व धर्मांच्या भावना समान आहेत.' असंही कोर्टानं सांगितलं.
चित्रपट बनवताना चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मानसिकतेवर न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती श्री प्रकाश सिंग यांच्या खंडपीठाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "तुम्ही कुराण ,बायबल आणि इतर पवित्र ग्रंथांना हात लावू नका. आम्ही हे स्पष्ट करू शकतो की, इथे कोणत्याही एका धर्माबद्दल चर्चा होत नाहीये. परंतु तुम्ही कोणत्याही धर्माचं वाईट वर्णन करू नका. न्यायालयाचा स्वतःचा कोणताही धर्म नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे ही काळजी आम्ही घेतो” असं कोर्टानं सांगितलं.
'चित्रपटात ज्याप्रकारे धार्मिक व्यक्तिरेखा साकारल्या गेल्या आहेत, त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असतील. अलीकडच्या काळात असे अनेक चित्रपट आले आहेत ज्यात हिंदू देवता आणि देवी विनोदी पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.', असेही न्यायालयाने नमूद केले.
'या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एका चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की, भगवान शंकर त्यांच्या त्रिशूलसह अतिशय मजेदार पद्धतीने धावत आहेत. या गोष्टी कशा दाखवल्या जाऊ शकतात? चित्रपटानं चांगला बिझनेस केला की, निर्माते पैसे कमवतात. एकोपा तोडण्यासाठी काहीतरी केले जात आहे. या विषयासाठी निर्मात्यांना पुढे यावं लागेल. हा विनोदाचा विषय आहे का?' असंही कोर्टानं सांगितलं.
न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान म्हणाले, 'समजा तुम्ही कुराणावर डॉक्युमेंट्री तयार केली आणि त्यात चुकीच्या गोष्टी दाखवल्या तर काय होईल? हे तुम्हाला समजेल. तथापि, आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू शकतो की ते कोणत्याही एका धर्माबद्दल नाही. योगायोगाने हा मुद्दा रामायणाशी संबंधित आहे, अन्यथा न्यायालय सर्व धर्मांचे आहे." न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, त्यांनी या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस आदेश दिलेला नाही.
कोर्टानं सेन्सॉर बोर्डालाही फटकारलं
भारताचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी न्यायालयाला सांगितले की, चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी प्रमाणित केला आहे. याबाबत कोर्टानं सांगितलं, 'तुम्ही म्हणताय की, सुसंस्कृत लोकांनी हा चित्रपट प्रमाणित केला आहे (बोर्ड सदस्यांचा संदर्भ देऊन) ज्या चित्रपटात रामायणाबाबत असे दाखवले जाते, त्या चित्रपटाला प्रमाणित करणारे ते लोक धन्य आहेत, ” कोर्ट सध्या प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सॅनन स्टारर चित्रपटाच्या संवादांविरोधात दाखल केलेल्या 2 जनहित याचिका (पीआयएल) हाताळत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :