Deepika Padukone | दीपिका पदुकोणकडून महत्त्वपूर्ण पदाचा त्याग, दिलं 'हे' कारण...
अभिनयासोबतच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) इतरही काही क्षेत्रांमध्ये सक्रिय आहे. त्यामुळेच की काय या अभिनेत्रीकडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं म्हणून पाहिलं जातं
मुंबई : अभिनयासोबतच बॉलिवूड कलाकार दीपिका पदुकोण (Deepika Padukone) इतरही काही क्षेत्रांमध्ये सक्रिय आहे. त्यामुळेच की काय या अभिनेत्रीकडे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वं म्हणून पाहिलं जातं. पण, आता मात्र याच अष्टपैलू अभिनेत्रीनं काहीसा अनपेक्षित निर्णय घेतला आहे. ज्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.
मानाच्या अशा मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज अर्थात, मामीच्या अध्यक्षपदाचा तिनं त्याग केला आहे. 2019 मध्ये दीपिकानं या पदाचा पदभार सांभाळला होता, पण आता मात्र कामाचंच कारण देत तिनं या पदावरून राजीनामा दिला आहे. (MAMI) सोबत काम करण्याचा अनुभव अतिशय सुरेख होता असं सांगत तिनं हे नातं आयुष्यभरासाठी कायम राहिल अशा भावनाही व्यक्त केल्या.
सोमवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपिकानं तिच्या या निर्णयाची माहिती सर्वांनाच दिली. 'मामीच्या नियामक मंडळासाठी काम करणं, अध्यक्षपदाची धुरा सांभाळणं हा अनुभव मला आणखी समृद्ध करुन गेला. एक अभिनेत्री म्हणून सिनेमा आणि जगभरातील कलावंतांना मुंबईपर्यंत, माझ्या दुसऱ्या घरापर्यंत आणण्याचा अनुभव अतिशय उत्साहवर्धक होता', असं तिनं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं.
Scam 1992 मध्येच नाही, तर Pratik Gandhi च्या खऱ्या आयुष्यातही लागू होतं 'रिस्क है तो इस्क है'!
सध्याच्या घडीला कामाचं स्वरुप पाहता येत्या काळात मामीसाठी आवश्यक तितकं लक्ष मी देऊ शकण्यास असमर्थ असेन. त्यामुळंच मी या पदाचा त्याग करण्याच्या निर्णयावर पोहोचत आहे, असं म्हणत ही संस्था अतिशय विश्वासार्ह व्यक्तींच्या हाती असल्याचं म्हणत तिनं आपलं 'मामी'सोबत असणारं नातं कायम असंच राहणार आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
दीपिका पदुकोण येत्या काळात तिच्या काही आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र असणार आहे. त्यामुळं तिच्या कामाचा एकंदर व्यास पाहता एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास तिला काही अडचणी येऊ शकतात. याचाच अंदाज घेत ती या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचली आहे. तिच्या या निर्णय़ाचंही कलाविश्वाकडून आणि चाहत्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे.