‘बाहुबली: द एपिक’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! प्रभास-राजामौलींच्या री-रिलिज चित्रपटाने मोडले अनेक विक्रम, पहिल्या दिवशी किती कमावले?
हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जगभरातील 1,150 हून अधिक सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आली आहे.

Bahubali the Epic: प्रभास आणि एस.एस. राजामौली यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांना एकत्र करून तयार करण्यात आलेल्या ‘बाहुबली: द एपिक’ या नव्या व्हर्जनने चाहत्यांचा उत्साहाला उधाण आलंय. (Bahubali theepic first day collection)
ही फिल्म 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुन्हा एकदा जगभरातील सिनेमागृहांत रिलीज करण्यात आली आणि पहिल्याच दिवशी 10.4 कोटी रुपयांची कमाई करत तिने री-रिलिज झालेल्या इतर चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. Sacnilk च्या अहवालानुसार, ‘बाहुबली: द एपिक’ने महेश बाबूच्या ‘खलीजा’ (₹5.75 कोटी) आणि ‘लोका चॅप्टर 1 चंद्रा’ (₹2.71 कोटी) सारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘बाहुबली: द एपिक’चा जलवा
एस.एस. राजामौली दिग्दर्शित आणि प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही फिल्म ‘महिष्मती’च्या जगात घेऊन जाते. अमरेंद्र बाहुबलीच्या उदयाची कथा नव्या स्वरूपात दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा कालावधी सुमारे 3 तास 45 मिनिटांचा आहे आणि या आवृत्तीत काही दृश्ये वगळण्यात आली आहेत, ज्यामुळे कथानक अधिक संक्षिप्त आणि प्रभावी बनले आहे. 'बाहुबली द एपिक' हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2D, 4DX, IMAX 2D आणि डॉल्बी सिनेमा 2D मध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.
जगभरात 1,150 पेक्षा जास्त स्क्रीनवर री-रिलिज
‘बाहुबली: द एपिक’ फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील 1,150 हून अधिक सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आली आहे. अमेरिकेत 400 पेक्षा जास्त स्क्रीन, ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये 210 स्क्रीन, तसेच UAE, ऑस्ट्रेलिया आणि साउथ ईस्ट एशिया मधील अनेक ठिकाणी हा चित्रपट दाखवला जात आहे.
बाहुबली द एपिकला देशातच नाही तर परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले- तुम्ही बाहुबली कितीही वेळा पाहिला असला तरी, चित्रपटाला नव्या रुपात पुन्हा पाहणे हा एक वेगळाच आनंद आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले- बाहुबली द एपिकने हे सिद्ध केले आहे की बाहुबली हे भारतीय चित्रपटातील सर्वोत्तम काम आहे. तर एकाने लिहिले, काल मी यूकेमध्ये बाहुबली द एपिक पाहिला. तिथल्या सिनेमागृहात मी 10 -15 स्थानिक लोकांना पाहिले, मी कधीही कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला भारतीय चित्रपट पाहण्यासाठी येताना पाहिले नव्हते, पण काल तेही घडले. एसएस राजामौली यांनी भारतीय चित्रपट जागतिक दर्जाचा बनवला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की हा चित्रपट फक्त भारतात पहिल्या दिवशी 50 कोटी रुपये कमवेल.चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून पॉझिटिव्ह रिव्ह्यूज मिळत असून, बॉक्स ऑफिसवर या फिल्मची गाडी जोमात धावताना दिसतेय.























