अक्षयकुमारचं मानधन 115 कोटींवरून आता 135 कोटी?
सुपरस्टार अक्षयकुमारने आपल्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. आता 2021 मध्ये चित्रित कराव्या लागणाऱ्या त्याच्या सिनेमांसाठी निर्मात्यांना 135 कोटी मोजावे लागणार आहेत.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सुपरस्टार अक्षयकुमारच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तो करत असलेले प्रत्येक सिनेमा गाजतोय. स्पेशल 26, बेबी, टॉयलेट- एक प्रेमकथा, पॅडमॅन, हाऊसफुल.. एक ना असे अनेक. म्हणून फोर्ब्जने केलेल्या सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या जगभरातल्या यादीत अक्षयकुमार होता. त्याचे सिनेमे आणि त्याला मिळणारं यश लक्षात घेता आता अक्षयने आपल्या मानधनात भरभक्कम वाढ केल्याची चर्चा जोरावर आहे.
अक्षयकुमारला हा लॉकडाऊनही खरंतर पथ्यावर पडला. याच लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक मानधन स्वीकारणाऱ्या गेल्या वर्षाच्या यादीत अक्षयकुमार होता. त्याच्या सिनेमांना प्रचंड यश मिळत असलं तरी त्याचा लक्ष्मी मात्र फारसा चालला नाही. ऑनलाईन रिलीज झालेल्या या सिनेमाला नेटकऱ्यांनी बरीच नावं ठेवली. असं असलं तरी अक्षयचं मार्केट फुल जोरात आहे. त्याला येणारं यश लक्षात घेता अक्षयने आपल्या मानधान घसघशीत वाढ केली आहे. यापूर्वी अक्षय करत असलेल्या सिनेमांसाठी तो मानधन घेत असे ते साधारण 115 कोटींचं असे. सगळ्याच सिनेमांना तो तेवढं मानधन आकारत नाही. सिनेमाचं बजेट, सिनेमाचा विषय लक्षात घेऊन तो त्याच्या मानधनात कपात करत असतो. पण साधारण त्याला घेऊन तयार होणारे व्यावसायिक चित्रपटांचा मुद्दा घेतला तर तिथे मात्र अक्षयकुमारने आपल्या मानधनात वाढ केली आहे.
यापूर्वी अक्षय 115 कोटी रुपये मानधन आकारत असे आता ते मानधन वाढत जाऊन 135 झालं आहे. त्याला अक्षयच्या गोटातून अद्याप काहीच प्रतिसाद आलेला नाही. पण फिल्मफेअर या अग्रगण्या सिनेनियतकालिकाने अक्षयने मानधन वाढवल्याचं सांगितलं आहे. ही वाढ 2022 मध्ये येणाऱ्या सिनेमांसाठी असणार आहे. 2022 मध्ये त्याच्या येणाऱ्या सिनेमांसाठी तो काम करेल ते पुढच्या वर्षी. त्या वर्षात तो आपलं मानधन वाढवणार आहे. सिनेमाची साधारण बजेट्स 70 ते 90 कोटींची असतात. अक्षयला सिनेमात घ्यायचं असेल तर आता या सिनेमांची बजेट्स दोनशे ते अडीचशे कोटींची असणं आवश्यक बनणार आहे.
अक्षयला आता तो करत असलेल्या सिनेमांची संख्या कमी करायची आहे म्हणून त्याने असा निर्णय़ घेतला आहे की त्याला असलेली मार्केट व्हॅल्यू वाढल्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय ते अद्याप कळायला मार्ग नाही. एकिकडे लॉकडाऊनमुळे सर्वच चित्रपटांची बजेट्स कमी होताना दिसत असताना अक्षयने आपल्या मानधनात वाढ करणं हे चकित करणारं असल्याचाही सूर निघतो आहे. पण तो जे सिनेमे करतो त्याला थिएटरमध्ये पैसा वसूल प्रतिसाद मिळतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. शिवाय, सूर्यवंशी प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ होणार आहे असंही तो भाकित वर्तवलं जातं आहे. अक्षयच्या पाठोपाठ आणि कोण कोण आपली मानधनं वाढवतं ते येत्या दिवसांत कळेल.