MLC Election 2022 : विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली; शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं!
MLC Election 2022 : 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे.
MLC Election 2022 : महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीचे घमासान पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेसाठी 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईत बोलावलं आहे.
शिवसेना आमदारांचा मुक्काम पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलमध्ये
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरु झाल्यात आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. 18 तारखेला मुंबईतल्या पवईमधील रेडियन्स हॉटेलमध्ये शिवसेना आमदार उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा वाजता शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या आमदारांनाही मुंबईत बोलावलं
राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या आमदारांना मुंबईत दोन दिवसात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना फोनवरुन बोलावणं धाडलं आहे. काही अपक्षांनाही मुंबईत बोलावलं आहे. सर्व आमदारांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाईल. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमदारांना पुन्हा एकदा मतदानाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
भाजपकडून मोर्चेबांधणी सुरु
तर दुसरीकडे भाजपने देखील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आमदारांना 18 जून रोजी मुंबईत बोलावलं आहे. मुंबईत ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये या आमदारांचा मुक्काम असेल. भाजपने राज्यसभेप्रमाणे येथेही एक टास्क फोर्स नेमली आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीची धुरा देवेंद्र फडणवीस यांनी या त्रिमूर्तींवर टाकली आहे.
विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?
- विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मतांची आवश्यकता आहे.
- राज्यसभेप्रमाणे मतदान झालं तर भाजपकडे सध्या 123 संख्याबळ आहे.
- त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.
- पाचव्या उमेदवारासाठी भाजपला 12 मतं कमी पडतात
- महाविकास आघाडीकडे 161 संख्याबळ आहे.
- त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील.
- तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.
देशमुख आणि मलिक यांच्या मतांचं काय होणार?
विधानपरिषदेसाठी सध्या 27 मतांचा कोटा आहे. मात्र अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळाली नाही तर हा कोटा घटून 26 होतो. त्यामुळे या दोन मतांचे काय होणार यावरही परिषदेचं बरच गणित अवलंबून आहे. अर्थात या प्रतिष्ठेच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनीही कंबर कसली आहे. यात कोण बाजी मारतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.