(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींच्या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ दिला. ज्यामध्ये, जिल्ह्याची कॅपिटल कोणती, असं मोदी बोलताना दिसत आहेत
मुंबई : राज्यातील 5 व्या टप्प्यात निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून आज मुंबई, ठाणे जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत. एकीकडे राज ठाकरेंची कल्याण-ठाणे लोकसभा मतदारसंघात सभा सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जाहीर शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई (Anil Desai) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला. कोरोना कालावधी, हिंदुत्त्व, अदानी-अंबानी पैसा, 10 वर्षाची कारकीर्द, नकली शिवसेना, बाळासाहेबांची संतान यासह विविध मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंनी मोदींवर पलटवार केला. तर, खुद्दार आणि गद्दार म्हणत अनिल देसाई यांना निवडून देण्याचं आवाहनही केलं.
उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींच्या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ दिला. ज्यामध्ये, जिल्ह्याची कॅपिटल कोणती, असं मोदी बोलताना दिसत आहेत. नवीन बाबू तुम्ही उभे राहा आणि कागद हाती न घेता, तुमच्या ओडिसा जिल्ह्यात किती कॅपिटल आहेत, त्यांची नावे सांगा, असे मोदी म्हणतात. या व्हिडिओवरुन उद्धव ठाकरेंनी त्यांची खिल्ली उडवली. तसेच, मोदीजी तुम्ही पेपर हाती घेऊन तुम्ही उभे राहा, 2014 आणि 2019 मध्ये तुम्ही दिलेली किती वचनं पूर्ण केली, हे वाचून सांगा, असे चॅलेंजच उद्धव ठाकरेंनी दिले. मात्र, मोदी सरकार हे गजनी सरकार आहे, 2014 आणि 2019 चं ह्यांना काहीच लक्षात राहत नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला. हिंदू-मुस्लीम ही नौटंकी बस करा, कोण मटन खातोय, कुणाला किती मुलं आहेत,हे पंतप्रधानांचं काम आहे का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका करताना, अदानी अंबानींकडून गाडी भरुन पैसे पाठवण्यात आले आहेत का, त्यामुळेच राहुल गांधींनी अदानी-अंबानी यांचं नाव घेणं बंद केल्याचं मोदींनी म्हटलं होतं. मोदींच्या या भाषणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी मोदींना सवाल केला. जर, काँग्रेसला गाडी भरुन पैसै अदानी-अंबानी यांनी पाठवले असतील तर मग तुमचे ईडी-सीबीआयवाले काय करत आहेत. ईडी सीबीआयची चौकशी लावा ना, असे आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच, तेव्हा ईडी-सीबीआय काय करत होते, चुना लावून बसले होते का, का ठेल्यावर ईडी, सीबाआयवाले चकना घेऊन बसले होते?, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारला.
तुमचा पक्ष भाजपला मुलं होत नाहीत, त्यात आमचा काय दोष. म्हणून, आमचे लेकरं खेळवायला नेत आहात. मला नकली संतान म्हणता, मग उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोदींनी मला वाराणसीला बोलावलं होतं, का बोलावलं होतं? त्यावेळी मी कोणाचा मुलगा आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं का? जेव्हा अमित शाहा माझ्या घरी आले होते, बाळासाहेबांच्या खोलीत येऊन बसले होते. त्यावेळी, मी कुणाचा मुलगा आहे, हे माहिती नव्हते का, असा प्रश्न विचारत तुम्ही माझ्या आई-वडिलांचा अवमान केलाय, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
दरम्यान, अनिल देसाई खुद्दार शिवसैनिक आहे, तर समोर गद्दार आहे. शुद्ध चरित्र्याचा आणि चारित्र्याचा उमेदवार समोरच्यांनी दिलाय, कसा बोलतोय तुम्ही पाहिलंय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल शेवाळेंवर निशाणा साधला.
अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे
दक्षिण मध्य मुंबईत शिवेसना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. येथे महाविकास आघाडीकडून अनिल देसाई तर महायुतीकडून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांद शिवसेनेचे दोन्ही नेते एकमेकांविरद्ध राजकीय मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.