Rajya Sabha Election 2022: निवडणूक आयोगाचा निर्णय नाही, शिवसेना आक्रमक, संजय राऊत अधिकाऱ्यांना जाब विचारायला गेले
मतदान होऊन तब्बल आठ तास झाले तरी मतमोजणी घ्यायची की नाही यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला नाही.
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या निवडणुकीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून शिवसेना नेते संजय राऊत आता अधिकाऱ्यांना जाब विचारायला विधानभवनात गेले आहेत. दरम्यान ही मतमोजणी आता सकाळी लवकर करावी अशी शिवसेनेने मागणी केल्याची माहिती आहे.
भाजपने महाविकास आघाडीची तीन मतं अवैध करावी अशी मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीनेही भाजपची दोन मत अवैध ठरावी अशी तक्रार केली. भाजपच्या तक्रारीची दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी थांबवली.
भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा, आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार?
जिंकणार तर महा विकास आघाडीच!
जय महाराष्ट्र!!
सकाळी 11 वाजता प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, शिवसेनेची मागणी
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. आता रात्र झाल्याने ही प्रक्रिया थांबवावी, सर्व बॅलेट सील करावेत आणि उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा मतमोजणी सुरू करावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप कुमार पांडे, मुंबईतून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्राची निवडणूक निरीक्षक अजय नायक यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक झाली. त्यानंतर निर्णय अपेक्षित होता, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने आठ तास झाले तरी मतमोजणीवर निर्णय दिला नाही.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. या संपूर्ण गोंधळात सात तासांपासून निकाल रखडला आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला विलंब झाला आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. "राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.