Raj Thackeray: शरद पवार म्हणतात आमचा पक्ष फोडला, मग तुम्ही आयुष्यभर काय केलं? राज ठाकरेंची घणाघाती टीका
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावतीने आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेत आहेत. या मेळ्यावातून राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली आहे.
Raj Thackeray मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावतीने आज (13 सप्टेंबर) राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेत आहेत. या मेळ्यावातून राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार बोलताना सांगतात की आमचा पक्ष फोडला. मात्र माझा त्यांना प्रश्न आहे की, तुम्ही आयुष्यभर काय केलं? 1978 साली काँग्रेस फोडली. 1991 साली शिवसेना फोडली, नंतर नारायण राणेंचे प्रकरण झालं. त्यामुळे तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करत आहात. असा सवाल करत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे.
अजित पवारांना जेलमध्ये टाकण्यापूर्वी त्यांना थेट मंत्रिमंडळात टाकलं- राज ठाकरे
पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांबद्दल मी यापूर्वीच बोललो आहे. मात्र भारतीय जनता पक्ष यांना स्वीकारतो तरी कसा? कारण अजित पवार महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. तर त्यांना जेलमध्ये टाकण्यापूर्वीच त्यांना थेट मंत्रिमंडळात टाकलं, असा मिश्किल टोला ही त्यांनी लागवला. हे का होतंय. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला गृहीत धरले जात आहे. तुम्ही कोण आहात आणि काय कराल? असे म्हणत मतांपुरता केवळ तुमचा वापर केला जात आहे. असेही राज ठाकरे म्हणाले.
पगार देण्याइतपत देखील पैसे सरकारकडे शिल्लक राहणार नाही
लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले जात आहे. तर मला राज्याच्या राजकारणाचा हेतूच कळत नाही. त्याचा उद्देशचं कळत नाही. तुम्हाला पैसे मागितलेच कोणी? मात्र आज मी तुम्हाला हे लिहून देतो निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला पैसे येतील. मात्र निवडणुका झाल्या की तुम्हाला पैसे येणार नाही. तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये कदाचित अशी परिस्थिती निर्माण होईल की या सरकारकडे पगार देण्याइतपत देखील पैसे शिल्लक राहणार नाही. असे म्हणत राज ठाकरे यांनी परत एकदा लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा