Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
मेहुणे पाहुण्यांच्या वादात बहिण अर्चना यांनी आता पती एवाय पाटील यांच्या बाजूनं उडी घेतली आहे. अर्चना पाटील या महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या बहीण आहेत, ए वाय पाटील यांच्या पत्नी आहेत.
Radhanagari Vidhan Sabha : माझ्या भावाने मला दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून माझे पती निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत, अशी प्रतिक्रिया राधानगरी विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता मेहुणे पाहुण्यांच्या वादात बहिण अर्चना यांनी आता पती एवाय पाटील यांच्या बाजूनं उडी घेतली आहे. अर्चना पाटील या महाविकास आघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या बहीण आहेत, ए वाय पाटील यांच्या पत्नी आहेत.
त्यामुळे माझ्या पतीवर अन्याय झाला
अर्चना पाटील यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून के पी पाटील यांनी फक्त आश्वासने दिली. मात्र. एवाय पाटील यांना संधी दिली नाही, असं म्हणत केपी पाटील यांच्यावर तोफ डागली. त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये केपी पाटील यांची लाडकी बहीण नाराज झाली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितले की आपली मेहुणे आमदार, मंत्री व्हावेत यासाठी ए वाय पाटील यांनी प्रामाणिकपणे काम केलं. 2014 मध्ये एवाय यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला होता. मात्र, मी त्यांना थांबवलं होतं. 2019 मध्ये के पी पाटील यांनी माझ्या सासू समोर म्हणजे त्यांच्या त्या आत्या सुद्धा आहेत. त्यावेळी पाया पडून केपी पाटील यांनी ही शेवटची निवडणूक लढतो आणि 2024 मध्ये ए वाय पाटलांना आमदार करतो असा शब्द दिला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी फक्त आश्वासन दिली आहेत, आता काय करायचे? अशी विचारणा अर्चना पाटील यांनी केली. आता 2024 मध्ये आता परत मीच आमदार होणार म्हणतात. काय म्हणायचं याला, फक्त वेगवेगळी आश्वासने देत राहिले, असेही अर्चना पाटील म्हणाल्या.
दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी आमदार के पी पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे एवाय पाटील यांच्या बंडखोरीचा उमेदवारीचा फटका कोणाला बसणार याचीच चर्चा सर्वाधिक रंगली आहे. के पी पाटील निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा पक्ष बदलताना मशाल हाती घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी आदमापुरात सभा सुद्धा घेतली आहे. अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर बाळूमामाचे दर्शन घेत उद्धव ठाकरे यांनी पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडला होता, तसेच राज्यातील प्रचाराची सुरुवात सुद्धा केली होती.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना सुद्धा केपी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी दिली होती. गद्दारीला थारा देऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये ए वाय पाटील यांची बंडखोरी कोणासाठी डोकेदुखी ठरणार याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या