केजरीवालांच्या 'झाडू'पुढे विरोधक साफ, एकहाती सत्ता, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही धोबीपछाड
Punjab Assembly Elections 2022 Results : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे.
Punjab Assembly Elections 2022 Results : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या आकेडावारीनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाला 92 जागा मिळाल्या आहेत. आपच्या झंझावातापुढे सत्ताधारी काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर अकाली दल आणि भाजपची अवस्था दयनीय अवस्था झाली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला 92 जागांवर विजय मिळवला आहे. सत्ताधारी काँग्रेसला फक्त 18 जागांवर समाधान मानावे लागले. शिरोमणी अकली दल पक्षाला तीन जागा तर बहुजन समाजवादी पार्टीला एक, भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. 117 विधानसभा जागा असणाऱ्या पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 59 जागांची गरज आहे. पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आप पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करेल. राजधानी दिल्लीनंतर केजरीवाल यांच्या आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ता मिळवली आहे. तर गोव्यात दोन जागांवर आपला यश मिळाले आहे.
दिग्गजांना पराभवाचा धक्का -
पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब कांग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला आहे. पंजाबमध्ये आलेल्या आपच्या त्सुनामीमध्ये अनेकांच्या नौका बुडाल्या आहेत. उपमुख्यमंत्री ओम प्रकाश सोनी यांचाही पराभव झाला आहे. अमृतसर सेंट्रल या विधानसभ मतदार संघातून अजय गुप्ता यांनी ओम प्रकाश सोनी यांचा पराभव केला आहे. ओम प्रकाश सोनी अमृतसह सेंट्रलमधून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 2007,2012 आणि 2017 मध्ये ओम प्रकाश सोनी यांनी विजय मिळवला होता. मात्र, आता आपच्या त्सुनामीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
काँग्रेसच्या पराभवाचे कारण काय?
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. अंतर्गत कलहाचा पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. याचा फटका काँग्रेसला बसल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. चरणजीत सिंह चन्नी यांनी सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अंतर्गत वादांमुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. पण तरिही पंजाबमध्ये काँग्रेससमोरील अडचणी कमी झाल्या नव्हत्या. नवज्योज सिंह सिद्धू आणि चन्नी यांच्यातील वाद समोर आला होता. याचाही फटका काँग्रेसला बसला. सिद्धू आणि चन्नी यांना आपली जागाही वाचवता आली नाही. दोघांनाही पराभवचा धक्का बसला आहे.
शहीद भगतसिंगांच्या खटकरकालन गावात शपथ घेणार; भगवंत मान यांचा निर्णय -
आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले भगवंत मान यांनी ऐतिहासिक विजयानंतर शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शहीद भगतसिंग यांचे पंजाबमधील खटकरकालन हे गाव आहे. पंजाबमधील आपच्या यशानंतर भगतसिंग यांच्या खटकरकालन या गावात मुख्यमंत्रीपदाचा शपथग्रहण सोहळा होईल आणि तेथेच भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान, पंजाबमध्ये विजय मिळवल्याबद्दल आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांचे अभिनंदन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांना फोन करून त्यांचे आणि पक्षाच्या विजयाचे अभिनंदन केले आहे.
केजरीवाल यांनी मानले कार्यकर्ते आणि जनतेचे आभार
विजयावर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली . केजरीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, या सत्तांतरासाठी पंजाबच्या नागरिकांचं खूप खूप आभार मानतो. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे.
पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला
पंजाबमधील आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचं सेलिब्रेशन आपनं दणक्यात केलं आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
2017 मध्ये कुणाला किती मिळाल्या होत्या जागा? -
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती.