चुनावी जुमला म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा, अमोल कोल्हेंची सरकारवर टीका
जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल, असं म्हणत जनतेला कमी लेखू नका असा इशारा कोल्हेंनी दिला. तर सुनील तटकरे यांनीही शिवसेना-भाजप सरकारवर निशाणा साधला.
रायगड : शिरुर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवाच्या काठीला आवाज नसतो, जनतेला किरकोळीत काढू नका. जनता जनार्दनाचा आवाज एकदाच घुमणार, जनतेला कमी लेखू नका, असा इशारा अमोल कोल्हे यांनी सरकारला दिला आहे.
सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथील सभेत अमोल कोल्हे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार आहेत.
याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकापची युती झाली आहे. त्यांच्या प्रचाराला कालपासून महाड येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. सरकारने गेल्या 5 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा पाढा याठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वाचला.
जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल, असं म्हणत जनतेला कमी लेखू नका असा इशारा कोल्हेंनी दिला. चुनावी जुमला म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा असल्याची टीकाही कोल्हेंनी केली. जातीवरुन जे बोलायचं असेल ते बोला, मी माझ्या मातीसाठी उभा राहणारा माणूस असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
पूर्वीच्या शिवसेना-भाजपच्या सरकारचा रिमोट कंट्रोल हा मातोश्रीवर होता. आताची शिवसेना फरफटत चालली असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली. तर, गेल्या 5 वर्षातील सरकार हे सर्वात दुर्बल सरकार असून सत्तेत बसल्यापासून एकमेकांवर फक्त टीका करण्यात आल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
गेल्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणणार असल्याचे आश्वासन अनंत गिते यांनी दिलं होतं. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकल्प आणण्यास विरोध केल्याचं वक्तव्य प्रचारावेळी अनंत गिते यांनी पुन्हा करुन दाखवल्यास आपण निवडणुकीच्या रिंगणात राहणार नाही, असं आव्हान सुनील तटकरे यांनी यावेळी दिलं.