मोठी बातमी: बड्या नेत्याचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांनी दिल्ली गाठली, अमित शाहांना भेटून मनसुबे उधळणार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या संभावित भाजप प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 चंद्रपूर: चंद्रपूरचे (Chandrapur) अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या संभावित भाजप प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे दिल्लीला रवाना झाले असून अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत भेट घेऊन जोरगेवार यांचा पक्षप्रवेश थांबवण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे कालच (गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर) किशोर जोरगेवार हे भाजप मधील सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधकांसह दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत सकारात्मक असल्याने मुनगंटीवार यांना थेट दिल्लीतील हायकमांडकडे दाद मागावी लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने थोड्या वेळात नागपूरसाठी रवाना होणार आहेत. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटून जोरगेवारांना पक्षप्रवेश आणि तिकीट देऊ नये, यासाठी ते मागणी करणार आहेत.
अमित शाहांना भेटून मनसुबे उधळणार
चंद्रपूर विधानसभेत बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला पक्ष तिकीट देत असल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठीकडे पोहचवण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तर बृजभूषण पाझारे यांना तिकीट द्यावी, ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना मैदानात ऊतरवू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे चंद्रपूर विधानसभेवरून भाजपमध्ये घमासान सुरू असल्याचे बोलले जात आहे.
काटोल मतदारसंघात भाजपमधील अंतर्गतवाद मुंबई दरबारी
नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात भाजपचं तिकीट चरण ठाकूर यांना मिळण्याची चर्चा असल्याने स्थानिक भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. काटोल मतदारसंघाची भाजपची तिकीट चरण ठाकूर यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच मतदारसंघातून भाजपचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे विधानसभेची तयारी करत होते. परिणामी, भाजप नेते आशिष देशमुख हे आता तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहे. काटोलमध्ये 2019 ला पराभूत झालेले चरण ठाकूर यांना उमेदवारीची शक्यता असल्याने स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आशिष देशमुख आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून आपले मत मांडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काटोल मतदारसंघात भाजपकडून कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा