(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajya Sabha Election 2022 : अपक्ष आणि इतर 29 आमदार किती महत्त्वाचे, घोडेबाजार होणार?
Rajya Sabha Election 2022 : भाजप आणि महाविकास आघाडीकडून ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय हालचाली जोरदार सुरू आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार उभा आहे. या दोन्ही उमेदवारांना जिंकण्यासाठी अपक्ष आणि इतर संघटनांच्या आमदारांचा मत फार महत्वाचे आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीची ही मतं मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे एकमेकांवर घोडेबाजाराचा देखील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची 29 मतं निर्णायक
महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतांच्या संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार आणि भाजपचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात हे स्पष्ट आहे.पण 6 व्या जागेसाठी शिवसेनेकडून दुसरा आणि भाजपकडून तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवण्यात आला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांकडेही तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची 29 मतं यामध्ये निर्णायक ठरणार आहेत.यात अपक्ष आमदारांना फार मोठे महत्व आले आहे त्यामुळे घोडेबाजार होणार, दबाव आणला जाणार असे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.
छोटे पक्ष आणि अपक्ष 29 आमदारांचं गणित काय ?
विधानसभेत 13 अपक्ष आमदार आहेत
तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत.
यामध्ये बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
एमआयएम - 2
प्रहार जनशक्ती पक्ष - 2
कम्युनिस्ट पक्ष - 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
मनसे - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1
जनसुराज्य शक्ती - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
तसेच 13 अपक्ष आमदार
असे एकूण मिळून 29 आमदार महत्त्वाचे आहेत.
अपक्ष कोण कोणाबरोबर आहे ?
भाजपबरोबर जनसुराज्य पक्षातील 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1आणि 5 अपक्ष आमदार आहेत सोबत आहेत. त्यामुळे भाजपकडे 113 आमदार आहेत.
तसेच अपक्ष व इतर पक्षांपैकी बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष 2, प्रहार जनशक्ती पक्ष 2, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 ,शेकाप 1,क्रांतीकारी शेतकरी पक्ष 1, कम्युनिस्ट पक्ष 1 आणि 8 अपक्ष आमदार असे महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत. त्यामध्ये बहूआ आणि इतर अपक्ष आमदार जे महाविकासआघाडी सोबत आहेत ते आता भाजपच्या संपर्कात असल्याचे देखील चर्चा आहे. त्यामुळे आम्ही देखील आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत अस महाविकासआघाडी नेत्यांनी म्हटलंय.
भाजप आणि शिवसेनेला किती मतांची गरज ?
मतांच्या संख्येनुसार राजकीय पक्षांकडून मतांचा कोटा साधारण 42 धरला जाईल. त्यामुळे राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 आमदारांच्या मतांची गरज असेल.त्यात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांनी आपल्या उमेदवारांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मत्त दिल्यानंतर काही शिल्लक राहतात . त्यामध्ये भाजपकडे 29 मतं शिल्लक राहतात. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी मग 13 अधिक मतांची गरज आहे. तर
तिसर्या जागेसाठी, शिवसेनेकडे 13 मतं शिल्लक राहतात, कॉंग्रेसकडे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 मतं शिल्लक राहतात. त्याचबरोबर महाविकास आघाडीला 16 इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे. ही सर्व मतं जरी शिवसेनेच्या दुसर्या उमेदवाराला मिळाली तरी त्याची संख्या 28 असेल. मग शिवसेनेला अधिक 14 मतांची गरज असेल. त्यामुळे अपक्ष आमदाराला गाठणे हे भाजप आणि महा विकास आघाडीसाठी महत्त्वाच आहे.
व्हीप लावल्यावर अपक्ष आणि छोटे पक्ष यांचं महत्त्व कसं वाढणार -
सहाव्या जागेसाठी भाजपला आणि महा विकास आघाडीला काही मतांची गरज आहे.त्यात राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षांना मतं दाखवावी लागतात. त्यामुळे सर्व आमदारांना 'व्हिप' लागू केला जातो. याचा अर्थ सर्व आमदारांना पक्षाचा आदेश पाळणं अनिवार्य असतं. अन्यथा त्या सदस्यावर पक्षाकडून कारवाई केली जाऊ शकते.परंतु अपक्ष आमदारांना हा 'व्हिप' लागू होत नाही. त्यामुळे अपक्ष आणि छोटे पक्ष यांचं महत्व या निवडणुकीत अधिक वाढलं आहे.
कोटी कोटी रुपये मोजले जाण्याची चर्चा सुरू
सध्या अपक्ष आणि इतर पक्ष संघटनांचे आमदार माध्यमांशी संवाद साधतात तर एक वेगळ्याच माजात आहे. कारण कधी का नवे आता त्यांना फार महत्त्व आलय. राजकीय वर्तुळात घोडेबाजार होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येतेय. त्यामध्ये कोटी कोटी रुपये मोजले जाण्याची चर्चा सुरू आहे, कारण पक्षाची प्रतिष्ठा आणि आव्हानाचा सवाल आता सहाव्या जागेसाठी आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी या येत्या काही दिवसात अनेक घडामोडी घडल्या शक्यता आहेत
अपक्ष आमदारांचं म्हणणं काय ? -
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी तसेच एमआयएम पक्षाचे फारुख शहा यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या पक्षश्रेष्ठींना सोबत आमची बैठक होणार आहे यानंतर आम्ही ठरवू मतदान कोणाला करायचं. अद्याप आमच्याशी महाविकासआघाडी व भाजप यांच्या कडून कोणताही संपर्क साधला गेला नाही. मात्र आम्ही योग्य त्या उमेदवाराला मतदान करू किंवा तटस्थ राहू अशी काहीही भूमिका अद्याप आम्ही ठरवलेले नाही. येत्या एक-दोन दिवसात आम्ही ठरवू असे त्यांचे म्हणणे आहे तसेच इतर अपक्ष आणि काही छोट्या पक्षातील आमदारांचे संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.