(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीचा कल जवळपास स्पष्ट झाला असून महायुतीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र आहे.
मुंबई : राज्यात महायुतीला लोकांनी जो कल दिला आहे ते लाडक्या बहिणीचे प्रेम आहे, अडीच वर्षे केलेल्या कामाची पोचपावती आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही, मुख्यमंत्रिबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांचा हा कल महायुतीला मिळाला आहे. आम्हाला लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी मतदान केलं. त्यामुळे लाडक्या बहिणींचे आभार. समाजातल्या प्रत्येक घटकाने आम्हाला मतदान केलं. गेले अडीच वर्षे आम्ही जे काम केलं त्याची ही पोचपावती आहे. मी लोकांचे आभार मानतो. पुढच्या कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय नाही
ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते म्हणाले की, ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ.
शिंदे गटाचा मुख्यमंत्रिपदावर दावा
दरम्यान, राज्यात सर्वाधिक जागा या भाजपच्या येणार असल्याचं चित्र आहे. एकट्याच्या भाजपच्या 125 हून अधिक जागा येतील असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी भाजपचा उमेदवार असेल असा दावा केला जात आहे.
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रिपदी शिंदे गटाचा दावा असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाच्या शितल म्हात्रे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे महायुतीला एवढं यश मिळालं. महायुतीने या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. लाडकी बहीण ही त्यांची योजना होती. त्यामुळेच महायुतीला हे यश मिळालं आहे.
ही बातमी वाचा: