Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभेत ठाकरेंचा शिलेदार ठरला, बडा नेता हाती बांधणार शिवबंधन, भाजपसमोर तगडं आव्हान
Dhule City Assembly Constituency : धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने अनुप अग्रवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे बड्या नेत्याला संधी देणार असल्याची माहिती मिळत आहे.
धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून (Dhule City Assembly Constituency) अनुप अग्रवाल (Anup Agrawal) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता अनुप अग्रवाल यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अखेर शिलेदार सापडला आहे.
माजी आमदार अनिल गोटे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश करणार असून सकाळी दहा वाजता मुंबई येथे मातोश्रीवर त्यांचा प्रवेश होणार आहे. अनिल गोटे यांना महाविकास आघाडीकडून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
धुळ्यात भाजप विरुद्ध ठाकरे गट लढत
यामुळे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून नाराजी व्यक्त होत आहे. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. रणजीत भोसले यांच्या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता भोसले नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची यादी जाहीर
दरम्यान, महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shivsena) आघाडी घेतल्याचे दिसून येते. शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे.
आणखी वाचा